विदर्भातील सर्व विद्यापीठांचे आयोजन : मुख्यमंत्री, गडकरी राहणार उपस्थितनागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षाच्या निमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे २१ आॅगस्टला विशेष सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे असून नागपूर येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजन होणार आहे.या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. डॉ.आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष समाजविकास प्रबोधन अभियान आयोजित करण्यात आले आहे. विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होता यावे यासाठी राज्यात चार ‘क्लस्टर्स’ करावे व उपक्रमांचे आयोजन निश्चित करावे, असा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार नागपूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाकडे विविध विद्यापीठांच्या ‘क्लस्टर्स’चे नेतृत्व राहणार आहे. याअंतर्गतच विदर्भातील सर्व विद्यापीठांनी मिळून नागपुरात विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे. नागपूर विद्यापीठाशिवाय गोंंडवाना विद्यापीठ, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ यांचा यात समावेश आहे. राज्यभरातील विद्यापीठांतील हा पहिला कार्यक्रम राहणार आहे. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील. तर समारोपप्रसंगी नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. विविध विद्यापीठांतील विद्यार्थी यावेळी सामाजिक विषयांवर सादरीकरण करणार आहेत. (प्रतिनिधी)नाना, नवाजुद्दीन, गुलजार येण्याची शक्यता२१ आॅगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमासाठी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर, नवाझुद्दीन सिद्धिकी, गीतकार गुलजार आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे मान्यवर येथे यावेत व त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद व्हावा, यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.
बाबासाहेबांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा २१ आॅगस्टला
By admin | Published: July 08, 2016 2:50 AM