नागपूर - देशात आणि राज्यात अस्थिरतेचे, अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातं. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का याची शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत सर्वाधिक जास्त तरुण असलेला देश असणार आहे. त्यामुळे ही युवाशक्ती आहे, बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या देशातील युवक बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. युवक देशाची शक्ती आहे. भावी आधारस्तंभ आहे. युवकाला बिथरू नका असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष ज्यापद्धतीने राज्य सरकारवर टीका करत आहे त्याचा समाचारही उद्धव ठाकरेंनी घेतला.
शेतकऱ्यांसाठी इथं गळा काढण्यापेक्षा केंद्राकडे गळा काढा, केंद्रात विरोधी पक्षाचं सरकार आहे. केंद्राकडून राज्याला येणारा जीएसटी परतावा जवळपास 15 हजार कोटी रुपये आहे. केंद्राने पहिला हफ्ता साडेचार हजार कोटी रुपये आलेले आहे. शिमगा करायचा असेल तर केंद्रा सरकारच्या नावाने करावा, राज्य सरकारच्या नावाने करु नका असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
दरम्यान, प्रश्न मांडायचे असतील तर ही पद्धत नाही. बोंबलून प्रश्न मांडता येत नाही. सरकार बदलल्यानंतर जनतेच्या मनात आनंद अपेक्षा, आशा पल्लवित झाल्या आहेत त्या खुरडण्याचा प्रयत्न करता येणार नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेला न्याय देण्याचं काम मी करत आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलून दाखविला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, अटक केलेल्या 10 लोकांपैकी 3 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.