निवडणुका लांबवून राष्ट्रपती राजवट लावण्याचे केंद्राचे षड्यंत्र, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
By कमलेश वानखेडे | Published: September 20, 2023 06:10 PM2023-09-20T18:10:45+5:302023-09-20T18:12:05+5:30
महिला आरक्षण हा नवीन जुमला
नागपूर : केंद्र सरकार घाबरले आहे. देशात २०० च्या आत जागा भाजपला मिळेल अशी शंका आहे. यात राहुल गांधींना लोकांचा पाठिंबा असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. निवडणुका लांबवायच्या व राष्ट्रपती राजवट लावायचे असे षड्यंत्र सुरू आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, महिला आरक्षण हा नवीन जुमला आहे. तारीख पे तारीख होणार आहे. काँग्रेसच महिला आरक्षण देईल. हे मोदी सरकारच्या नशिबी नाही, पहिली महिला राज्यपाल, राष्ट्रपती कॉंग्रेसने दिली आहे. पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी, त्यासाठी वरिष्ठ ठरवतील. ओबीसी महिला यातून वगळता येणार नाही. त्यांनाही आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान
मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने सोयाबीन हातचे गेले आहे. पिकांची परिस्थिती वाईट आहे. सरकारने शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन अहवाल घेतला पाहिजे. तातडीने मदत कशी करता येईल यावर विचार झाला पाहिजे. प्रोत्साहन राशी, नुकसानभरपाई मिळाली नाही. कृषी मंत्र्यांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूरच्या ओबीसी कार्यकर्त्याला काही झाले तर सरकार जबाबदार
चंद्रपूर येथे ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कार्यकर्ता आमरण उपोषणाला बसला आहे. या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी यासाठी आपण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आपण मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चाही करणार आहोत. उपोषणावर बसलेल्या या कार्यकर्त्याला काही झाो तर सरकार जवाबदार राहील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.