नागपूर :नागपूर महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत २७ मार्च २०२३ रोजी कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या तीन पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ११ एप्रिल रोजी मुलाखती होत्या. परंतु मनपाने विधी अधिकारी सहायक पदाच्या भरतीत आरक्षणाच्या आकृतीबंधाला डावलल्याने केंद्र सरकारचा अनुसूचित जाती आयोगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना नोटीस बजावली असून येत्या १५ दिवसात केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाला आपला विस्तृत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती ॲड. राहुल झांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ॲड. झांबरे यांचे म्हणणे आहे की मनपामध्ये लोकप्रतिनिधी कार्यरत नसतांना आणि राज्य सरकारची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मनपाचा आकृतिबंधामध्ये नमूद नसलेल्या पदाची जाहिरात मनपा आयुक्तांनी केवळ हेतुपुरस्सरपणे काढली आहे. जे संपूर्णतः कायदेकक्षाचा बाहेर असून असंविधानिक आहे. केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने १० एप्रिल २०२३ ला मनपा आयुक्तांना नोटीस बजाविल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी मनपा आयुक्तांनी तडकाफडकी उमेदवारांच्या थातुरमातुर मुलाखती घेऊन आयोगाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. याशिवाय मनपाचा मागासवर्गीय कक्षाचीही आरक्षण बिंदु नियमावलीची पूर्व परवानगीही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतली नसल्याचा आरोपही यावेळी अँड. राहुल झांबरे यांनी केला आहे. त्यामुळे २७ मार्च २०२३ रोजी विशिष्ट अशा केवळ खुल्या संवर्गातील तीन कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यकाची नियुक्ती करण्याबाबतची जाहिरात तात्काळ रद्द करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली.
यावेळी ॲड. प्रतिक पाटील, ॲड. नितीन गवई, ॲड. समिंद्रा करवाडे, ॲड. राजन फ़ुलझेले, ॲड. युवराज कांबळे, ॲड. मधुकर गडकरी आदी उपस्थित होते. आयुक्तांनी खुलासा दिलेल्या वेळेत न दिल्यास मनपा आयुक्तांवर आयोगातर्फे समन्स बजावण्यात येईल अशी तंबीसुद्धा दिल्याचे ते म्हणाले.