नागपूर : नागपूर शहरातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने पुढे पाऊल टाकत वाटचाल सुरू केली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
१९२७ कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० कि .मी. सीवेज लाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. प्रकल्पामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार व नागपूर महापालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात वाटा राहणार आहे. केंद्र सरकार १११५.२२ कोटी, राज्य सरकार ५०७.३६ कोटी व मनपा ३०४.४१ कोटींंचा खर्च करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १,३१८६१ घरांना सीवेज नेटवर्कमध्ये जोडण्यात येईल.
नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, त्यावर प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे. महापालिका हा प्रकल्प राबविणार असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.
नद्यात येणारे सांडपाणी रोखणार
नाग व पिवळी नदीत प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडण्यात येते. तसेच कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. दूषित पाणी रोखण्यासाठी सीवेज लाईन सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडण्यात येणार आहे. याचाही यात समावेश करण्यात आला आहे.
प्रकल्पातील प्रमुख मुद्दे
- अंबाझरी तलावातून नाग नदी उगम पावते
- नाग नदीची एकूण लांबी ६८ किमी आहे.
- शहरी भागात नाग नदीची लांबी १५.६८ किमी आहे.
- प्रकल्पांतर्गत नवे एसटीपी (९२ एमएलडी) तयार करण्यात येतील.
- एसटीपी(१० एमएलडी) अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्यात येईल.
- नवीन ४ पम्पिग स्टेशन.
- १०७ मॅनहोल वळण (मॅनहोल डायव्हर्सन)
- ४८.७८ किमी इंटरसेप्टर सिवर (नाग नदी व पिवळी नदी वर)
- उत्तर झोनमध्ये २४७.९किमी सीवेज लाईन, तर मध्य झोनमध्ये २११.६०किमी सीवेज लाईन बदलण्यात येतील.
- प्रकल्प झाल्यानंतर नाग नदी, बोरनाला आणि पिवळी नदीचा पाण्याची गुणवत्ता सुधारेल.
- प्रकल्प वर्ष २०४९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- शहराचा स्वच्छतेमध्ये सुधारणा होईल.
- नद्यांच्या पाण्याचा प्रदूषण स्तर कमी होईल.