मंगेश व्यवहारे, नागपूर : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटी मिशन आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूरला 'भारतातील शहरांमध्ये हेल्दी स्ट्रीट्स' तयार करण्यात अग्रेसर असल्याबद्दल उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभाग आणि स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजच्या नोडल अधिकारी डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. “इंडिया सायकल फॉर चेंज अँड स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज फेज-२”मध्ये २९ शहरांमधून नागपूरसह देशातील १५ अग्रणी शहरांची निवड करण्यात आली होती. नागपूर शहरातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी आरोग्यदायी पथ धोरण विकसित करणे, संस्थात्मक उभारणी आणि शहर पातळीवर क्षमता वाढविणे तसेच शहरातील आरोग्यदायी (हेल्दी) रस्त्यांच्या पायाभूत सुविधा वाढविण्याबाबत एक आदर्श निर्माण करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या नागपूरला उत्कृष्टतेचा पुरस्कार देण्यात आला आहे.