नरेश डोंगरे ल्ल नागपूर कुख्यात कैद्यांनी पलायन केल्यामुळे देशभर चर्चेला आलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील प्रशासन सांभाळण्यासाठी सरकारने कारागृह अधीक्षक आणि अनेक वरिष्ठ तुरुंगाधिकारी नेमले आहे. मात्र, या सर्वांवर एका ‘मॅडम‘ने मात करीत कारागृहाच्या कारभाराचा रिमोट आपल्या हातात ठेवला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कारागृह अधीक्षक वैभव कांबळेच्या आडून ही मॅडम आर्थिक व्यवहार सांभाळायची, त्याचमुळे कारागृहात भ्रष्टाचार वाढल्याची सूत्रांची माहिती आहे.अधीक्षक म्हणून कांबळेंनी जबाबदारी हाती घेतल्यानंतर मध्यवर्ती कारागृहात प्रत्येक घडामोडीसाठी पैशाची मागणी होऊ लागली. कैदी एकदा आत दाखल झाला की त्याला कुठे ठेवायचे, या मुद्यावरूनच पैशाची मागणी केली जायची. पैसे न दिल्यास अंडासेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जायची. कैद्याला खाण्यापिण्याच्या चिजवस्तू आणि काय पाहिजे त्याचे वेगवेगळे रेट होते. कैद्याचे नातेवाईक, मित्र यांच्याकडून रक्कम मागून घेतली जायची. ही रक्कम स्वीकारण्याचे केंद्र कारागृहाच्या दक्षिणेला असलेल्या ‘वॉशिंग सेंटर’कडे होते. कांबळेंच्या मर्जीतील तीन खास कर्मचारी ‘कलेक्शन‘ करायचे. या रकमेचा हिशेब मॅडमच सांभाळायच्या. कांबळे तोंडून शब्द बाहेर काढत नव्हता. कांबळेच्या अधिकाराचा वापर कैद्यांकडूनच रक्कम वसूल करण्यासाठी होत नव्हता. तर, काही तुरुंगाधिकारी आणि काही कर्मचाऱ्याना मनासारखी ड्युटी देण्यासाठी आणि त्यांच्या सुट्या मंजूर करण्यासाठीही ‘मॅडम‘ रक्कम वसूल करीत होत्या. त्यासाठी कारागृहाच्या ‘हजेरी मस्टर‘चा पध्दतशीर वापर केला जात होता, असे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. थोडक्यात कारागृहाचा कारभार सांभाळण्यासाठी अधीक्षकांचे पद असले तरी रिमोट मात्र ‘मॅडम‘च्याच हाती होता.कर्मचाऱ्यांचा अपमान या मॅडमचा कर्मचाऱ्यांवर प्रचंड धाक होता. त्या येता जाताना कुणी त्यांना सॅल्यूट ठोकला नाही, तर त्याचा अपमान करून ‘पनिशमेंट’ देण्यासाठीही ‘मॅडम’ मागेपुढे पाहात नव्हत्या, अशी माहिती आहे.
मध्यवर्ती कारागृहाचा रिमोट ‘मॅडम’च्या हाती
By admin | Published: April 04, 2015 2:25 AM