नागपूर : पावणेदोन लाखांची लाच मिळावी म्हणून रेल्वेच्या कंत्राटदाराला वेठीस धरणाऱ्या मध्य रेल्वेच्या एका अभियंत्याला सीबीआयने जेरबंद केले. गुरुवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे रेल्वेत एकच खळबळ उडाली. ए. बी. चतुर्वेदी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते मध्य रेल्वेत सहायक विभागीय अभियंता (दक्षिण) म्हणून कार्यरत होते.
वर्धा जिल्ह्यातील सुभाष फत्तेचंद सुराणा आणि रितेश सुभाष सुराणा हे मध्य रेल्वेच्या काही भागाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राटदार आहे. त्यांनी केलेल्या कामाचे ८९ लाख, ५५ हजारांचे बिल रेल्वेकडून घेणे होते. ते मंजूर करण्याचा अधिकार चतुर्वेदी यांना होता. त्यामुळे सुराणा त्यांच्याकडे सारखे येरझारा घालत होते. तर, या एकूण बिलाच्या २ टक्के रक्कम अर्थात एक लाख ८० हजार रुपये लाच मिळावी म्हणून चतुर्वेदी सुराणा यांना त्रास देत होते. बिल मिळावे म्हणून चतुर्वेदी यांच्याकडे सहा महिन्यांपासून सारखे हेलपाटे मारूनही ते बिल काढून देत नसल्याने अखेर बुधवारी सुराणा यांनी सीबीआयचे अधीक्षक सलीम खान यांच्याकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर अधीक्षक सलीम खान यांनी गुरुवारी सापळा लावला. त्यानुसार, १.८० लाखांची लाच स्वीकारताना चतुर्वेदी सीबीआयच्या जाळ्यात अडकले. त्यांना जेरबंद केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी झडती सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर ही झडती सुरूच असल्याने त्यांच्याकडून आणखी काय मिळाले, ते स्पष्ट झाले नाही. चतुर्वेदी यांना शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२० वर्षांपासून नोकरी
चतुर्वेदी गेल्या २० वर्षांपासून रेल्वेत सेवारत असून, नागपुरात ते गेल्या साडेतीन वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी अशा गैरप्रकारातून कोट्यवधींची मालमत्ता जप्त केल्याची रेल्वेच्या वर्तुळात चर्चा आहे.
सीबीआय फार्मात
मार्चअखेरपर्यंत बॅकलॉग पूर्ण करण्यावर सर्वच सरकारी विभागाचा भर असतो. सीबीआयच्या स्थानिक युनिटमधून कारवाई होत नसल्याचे गेल्या वर्षभरातील चित्र होते. मात्र, येथे अधीक्षक म्हणून नुकताच पदभार स्वीकारणारे सलीम खान यांनी जोरदार धमाका लावला आहे. गेल्या महिन्याभरातच त्यांनी तीन मोठ्या कारवाया करून भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध ‘स्वच्छ भारत अभियान’ गतिमान केले आहे.
----