नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव शुक्रवारी, २ फेब्रुवारीला नागपूर विभागात दाैऱ्यावर येत आहेत. या एक दिवसीय दौऱ्यात ते नागपूरसह बडनेरा आणि वर्धा भागातही भेट देणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरू असलेल्या रेल्वेच्या विविध कामासंबंधीची सुरक्षा तपासण्यासाठी यादव दौऱ्यावर येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यानुसार, ते नागपूर सोबतच बडनेरा आणि वर्धा भागातील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत.
विशेष म्हणजे, विदर्भ मराठवाडा या दोन भागांना जोडणारा बहुचर्चित वर्धा - यवतमाळ - पुसद - नांदेड या रेल्वे मार्गाचे काम कळंब (यवतमाळ) पर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुर्ण झालेल्या मार्गावर रेल्वे गाडी सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येऊ शकतात, अशी चर्चा आहे. ते यवतमाळ येथून वर्धा ते कळंब रेल्वे मार्गाचे लोकार्पण करून रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविण्याचीही शक्यता असून त्यासंबंधाने रेल्वे प्रशासनाकडून उर्वरित कामांची पूर्तता करण्यासाठी धावपळ केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, महाव्यवस्थापक यादव वर्धा जिल्ह्यातील देवळी, भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब रेल्वे स्थानकांची पाहणी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसभराच्या दौऱ्यानंतर यादव शुक्रवारी सायंकाळी नागपुरातील रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.