नागपूर : उन्हाळ्यात प्रवाशांची रेल्वेगाड्यात होणारी गर्दी आणि रेल्वेच्या फेऱ्या तसेच जागेअभावी होणारी परवड लक्षात घेत मध्य रेल्वेने नागपूर पुणे मार्गावरच्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ५ एप्रिलपासून १५ जूनपर्यंत नागपूर अजनी पुणे तसेच पुणे अजनी अशा एकूण २२ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.
या दोन गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. ०११८९ स्पेशल पुणे जंक्शन येथून ५ एप्रिलला बुधवारी दुपारी ३.१५ वाजता नागपूरकडे प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता नागपुरातील अजनी स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे ०११९० स्पेशल अजनी स्थानकावरून ६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दर गुरुवारी रात्री ७.५० वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ११.३५ वाजता पुण्यात दाखल होईल. या दोन्ही गाड्या जाता-येताना दाैंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबून प्रवाशांची चढ-उतार करेल.
अशी आहे कोचची रचना
या गाड्यांमध्ये एक प्रथमश्रेणी वातानुकुलित, दोन द्वितीय वातानुकुलित, ५ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच आणि त्यात दोन गार्डस् ब्रेक व्हॅन राहणार आहे. या दोन्ही गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह ३१ मार्चपासून सर्व कॉम्प्युटराईज बुकिंग केंद्रावर करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
-----