लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळ्यात थर्टी फर्स्ट आणि ख्रिसमसच्या निमित्ताने प्रवाशांची रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विंटर स्पेशल म्हणून ३० गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ६ डिसेंबरपासून या रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत.
पुणे-अजनी साप्ताहिक स्पेशल
०१४४३ ही स्पेशल गाडी पुण्याहून प्रत्येक मंगळवारी ६ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत चालविली जाईल. दुपारी ३.१५ वाजता ती पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता नागपुरात पोहोचेल.
ट्रेन नंबर ०१४४४ ही स्पेशल गाडी ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत प्रत्येक बुधवारी अजनी स्थानकावरून रात्री ७.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ११.३५ वाजता पुण्यात पोहोचेल. या दोन्ही गाड्या मार्गातील दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबतील. १३ एसी ३ टायर आणि २ जनरेटर व्हॅन या गाड्यांना राहील.
मुंबई - नागपूर साप्ताहिक स्पेशल
०१४४९ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता नागपुरात पोहोचेल. ८ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत ही सेवा राहील. तर, ०१४५० ही रेल्वेगाडी ९ डिसेंबरपासून नागपूरहून दर शुक्रवारी दुपारी १.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई स्थानकावर पोहोचेल. ७ जानेवारीपर्यंत ही साप्ताहिक सेवा राहील. या गाड्यांचे थांबे कल्याण, ईगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे राहणार आहेत.
पुणे-नागपूर साप्ताहिक स्पेशल
७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत दर बुधवारी दुपारी १.३० वाजता ०१४५१ ही विशेष रेल्वेगाडी नागपूर स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ०१४५२ ही विशेष रेल्वेगाडी ८ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या कालावधीत दर गुरुवारी १०.४५ वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल.
मार्गातील दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा रेल्वेस्थानकावर ही गाडी थांबेल.