विविध मागण्या : प्रशासनाच्या विरोधात नाराजीनागपूर : सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय सांकेतिक उपोषण करण्यात आले.आंदोलनात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष आर. एन. चांदूरकर, सचिव विनोद चतुर्वेदी, विभागीय संघटक देबाशीष भट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यात्री तिकीट सेवा केंद्राच्या नावाने प्रथम श्रेणीच्या प्रवाशांकडून ४० रुपये आणि स्लिपरक्लासच्या प्रवाशांकडून ३० रुपये वसूल करून ही रक्कम हे केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारांना देण्याच्या बाबीचा निषेध करण्यात आला. याशिवाय बुकिंग आणि रिझर्व्हेशन क्लर्कची भरती बंद केल्यामुळे काऊंटरवर लागणाऱ्या मोठमोठ्या रांगामुळे प्रवाशांना यात्री तिकीट सेवा केंद्रात जावे लागत आहे. तेथे त्यांची लूट होत असल्याच्या बाबीचा उल्लेख करण्यात आला. याशिवाय कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट १९७० नुसार कोणत्याही नियमित कामास कंत्राटदाराकडून करून घेणे चुकीचे आहे. तरीसुद्धा रेल्वे या कायद्याचे उल्लंघन करीत असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. उपोषणात वाणिज्य विभागाचे ई. व्ही. राव, आशिष भिवगडे, अजय सिंह बैस, व्हिक्टोरिया रॉय, सुनील पळसकर, रितेश वर्मा आणि सर्व शाखाचे कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपोषण
By admin | Published: August 26, 2015 3:10 AM