नागपूर : मध्य रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी नागपूर विभागाला उत्कृष्ट विभागाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. महाव्यवस्थापक समग्र दक्षता शिल्ड रेल्वे सप्ताहादरम्यान महाव्यवस्थापक सूद यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. उत्कृष्ट विभागाच्या पुरस्काराशिवाय विविध विभागांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाव्यवस्थापक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. यात सुरक्षा, परिचालन, भांडार, स्वच्छता विभागाचा समावेश आहे. यात अतिरिक्त कार्यकुशलता पदक संयुक्तरीत्या देण्यात येणार आहे. नागपूर रेल्वेस्थानकाला सर्वाधिक स्वच्छ स्थानक आणि घोराडोंगरी रेल्वेस्थानकाला उद्यानाची चांगली देखभाल केल्याबद्दल पदक प्रदान करण्यात येईल. बल्लारशा रनिंग रूमला बेस्ट रनिंग रूम शिल्ड, नागपूर विभागाला सर्वोत्कृष्ट जमीन व्यवस्थापन, वृक्षारोपण शिल्ड, आंतरविभागीय क्रीडा शिल्ड, स्काऊट आणि गाईडला उत्कृष्ट कार्यासाठी पदक देण्यात येईल. याच प्रमाणे ४ रेल्वे अधिकारी आणि २४ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांच्या हस्ते १२ एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. काटोल येथील गँगमन गुंजन वाळके आणि अब्दुल बख्तियार यांना रेल्वे बोर्डातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वे नागपूर विभागाला उत्कृष्ट विभागाचा पुरस्कार
By admin | Published: April 12, 2016 5:35 AM