नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)च्या नाेटीसनंतर शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पथकाने काेराडी व खापरखेडा औष्णिक वीजकेंद्राद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली. वीजकेंद्रातून निघणारी पाईपलाईन जागाेजागी फुटल्याने नदी, तलाव व शेतात पसरलेला राखेचा प्रवाह पाहून त्यांनाही धक्का बसला. मंत्रालयाच्या पथकाने हा सर्व प्रकार ताबडताेब थांबविण्याचे कडक निर्देश साेबत असलेल्या महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मंत्रालयातर्फे वैज्ञानिक डाॅ. सुरेश कुमार अडपा, डाॅ. पी. साखरे यांच्यासह इतर अधिकारी, एमपीसीबीचे अधिकारी तसेच महाजेनकाेचे अधिकारी या निरीक्षण दाैऱ्यात सहभागी हाेते. यासह प्रदूषणाविराेधात सातत्याने लढा देणाऱ्या सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे, शुभांगी पडाेळे तसेच सुरादेवी, वारेगाव, भानेगाव, कवठा आदी गावचे सरपंच व ग्रामस्थ सहभागी हाेते. या पथकाने काेराडी व खापरखेडा वीजकेंद्राला लागून असलेल्या गावांमध्ये आठ ठिकाणी पाहणी केली.
- खैरी गावच्या नाल्यातून सांडपाणी नाही तर राखेचा प्रवाह वाहत असल्याचे दिसले. सरपंच माेरेश्वर कापसे यांनी हा प्रकार थांबविण्याची मागणी केली. एमपीसीबीच्या पथकाने नाला व बाेअरवेलच्या पाण्याचे नमुने गाेळा केले.
- कवठा जलशुद्धीकरण केंद्र, वारेगाव राेडवर अक्षरश: काेराडी वीजकेंद्राची राख पसरली हाेती.
- सुरादेवी, काेलार नदी : खापरखेडा वीजकेंद्राची राख फुटलेल्या पाईपलाईनमधून थेट वाहत असल्याचे दिसून आले. गावातील बाेअरवेलच्या पाण्याचे नमुनेसुद्धा गाेळा करण्यात आले.
- वारेगाव अॅशबाॅण्डची राख थेट वारेगाव पुलाखाली साेडली जाते. यानंतर अॅशबाॅण्डच्या पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या वारेगाव पंपहाऊसचेही निरीक्षण करण्यात आले.
- भानेगाव पूल : या पाॅइंटवरून खापरखेडा केंद्राची राख थेट कन्हान नदीत जात असल्याचे आढळून आले. येथील पाण्याचे नमुनेही घेण्यात आले.
ताबडताेब बंदाेबस्त करा
वेगवेगळ्या ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईनमधून राखेचा प्रवाह नदी, तलावात मिसळून पाणी प्रदूषित करीत आहे. या प्रदूषणामुळे अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावर तातडीने उपाययाेजना करण्याचे निर्देश महाजेनकाेला देण्यात आले. महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांनी उपाययाेजना करण्याचा भराेसा दिला.
राखेचा १०० टक्के उपयाेग का नाही?
वीजकेंद्राच्या राखेचा १०० टक्के उपयाेग करण्याचे केंद्रीय मंत्रालयाचे निर्देश आहेत; पण काेराडी, खापरखेडा केंद्राद्वारे तसे नियाेजनच करण्यात आले नाही. उलट विदर्भात राखेला मागणी नसल्याचे महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे हाेते. मग माैदा वीजकेंद्राप्रमाणे इतरत्र का पाठविली जात नाही, असा प्रश्न पडताे.
समिती स्थापन करण्याचे निर्देश
वीजकेंद्रातील प्रदूषणावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व एनजीओच्या प्रतिनिधींना घेऊन एक समिती स्थापन करण्याचे निर्देश मंत्रालयाने महाजेनकाेला दिले.