नागपूर : विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात वाढते रुग्ण व मृत्यूदराबाबत केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली. ज्या भागात रुग्णांची संख्या वाढत आहे तिथे, ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंटवर भर देण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. सोबतच ग्रामीण भागात अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याव्या सूचनाही त्यांनी केल्या. सोमवारी केंद्रीय आरोग्य विभागाचा तीन सदस्यीय पथकाकडून नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा स्थितीचा आढावा घेतला असता त्यांनी अनेक उणिवांवर बोट ठेवले.
इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स कार्यक्रमाचे संचालक डॉ. सुजित कुमार सिंग, उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी व डॉ. रणजित कौशिक ही त्रिसदस्यीय पथक कोरोनाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी अमरावती विभागाची माहिती घेतल्यावर सोमवारी नागपुरात आढावा बैठक घेतली. आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयात दिवसभर चाललेल्या बैठकीत वाढते रुग्ण व मृत्यूदरावर त्यांनी चर्चा केली. यावर त्यांनी कठोर उपाययोजना करण्याचे, चाचण्यांची संख्या वाढविण्याचे, उपचाराखाली असलेल्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे, होम आयसोलेशन रुग्णांवर पाळत ठेवण्याचे व कोरोना नियमवालींचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंह, मेडिसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश गोसावी, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्यासह मनपाचा आरोग्य विभागाचे अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.
- खासगी रुग्णालयातील मृत्यूदराची तपासणी करा!
खासगी रुग्णालयात वाढलेले मृत्यू किंवा कमी असलेला मृत्यूदराची तपासणी करण्याच्या सूचनाही केंद्रीय आरोग्य पथकाने केल्याची माहिती आहे. सूत्रानुसार, पथकाने अशा रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोनावरील उपचाराच्या प्रोटोकॉलवरच बोट ठेवले आहे.
-कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना हुडकून काढा
ज्या भागात रुग्ण जास्त वाढत आहे त्या भागात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना हुडकून काढण्याचे म्हणजे ‘ट्रेसिंग’ करण्याचे, संशयितांचे ‘टेस्टिंग’ करण्याचे व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर तातडीने ‘ट्रीटमेंट’ करण्याचा सूचनाही पथकाने दिल्या. सूत्रानुसार, जिथे जास्त रुग्ण आढळून येत आहे तिथे रॅपिड अँटिजेन तर जिथे कमी रुग्ण आहेत तथे आरटीपीसीआर चाचणी करण्यासही त्यांनी सुचविले.