निशांत वानखेडे
नागपूर : रेस्टाॅरंट किंवा अगदी रस्त्याच्या ठेल्यांवर मिळणारे इडली, डाेसा, सांभारवडा, पकाेडे खाण्याचा माेह आवरता येत नाही. त्याचे आराेग्यावर विपरीत परिणाम हाेत असले तरी हे खाद्यपदार्थ आपल्या व्यस्त जीवनशैलीचा भाग झाले आहेत. त्यामुळे हे पदार्थ खाऊ नका, असा सल्ला कुणी दिला तरी आपण ऐकणार नाही. म्हणून आम्ही ते खाऊ नका, असा सल्ला देणारही नाही. उलट म्हणू खा; पण भरडधान्यापासून तयार झालेले खा. फास्ट फूडचा आनंदही मिळेल, ताेही आराेग्यदायी पाेषक घटकांसह.
हाेय, व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाने नाचणी, कुटकी, कंगनी, राळा, सावा, ज्वारी अशा मिलेट्सपासून २५-३० प्रकारचे व्यंजन बनविता येतील, अशा रेसिपीज तयार केल्या आहेत. विभागप्रमुख प्रा. सचिन मांडवगणे यांच्या मार्गदर्शनात प्रफुल्ल दाढे, डाॅ. श्वेता देवतळे, डाॅ. इप्शिता चक्रवर्ती यांच्या टीमने ही मिलेट्सची ‘रेडी टू इट रेसिपी’ तयार केली आहे. त्यांनी इडली, डाेसा, उत्तप्पा, अप्पे, पकाेडे, थालीपीठ, पराठे, पुऱ्यांसह नानखटाई, केक, कपकेक, कुकीज आदी बेकरी प्राॉडक्ट तसेच पुरणाची पाेळी, लाडू, चकली, शंकरपाळे आदी दिवाळी फराळाचे पदार्थही सहज तयार हाेतील, अशी रेसिपी तयार केली आहे.
प्रा. मांडवगणे यांनी सांगितले, विभागाने २०१८ पासून पाेषणयुक्त व पाचनयुक्त नैसर्गिक खाद्यपदार्थ तयार करण्यावर काम सुरू केले हाेते. या अभ्यासादरम्यान मिलेट्सचे महत्त्व लक्षात आल्याने २०२१ पासून मिलेट्सवर काम सुरू केले. त्यांनी विविध भरडधान्याचे मिश्रित पीठ तयार करून त्याद्वारे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविण्याची रेसिपी तयार केली आहे. याच पीठाने पदार्थ बनविता येतील किंवा नेहमीच्या पदार्थात हे घटक २० ते ५० टक्के अशा थाेड्या प्रमाणात मिश्रित करून पदार्थ बनविता येत असल्याचेही प्रा. मांडवगणे यांनी सांगितले.
स्टार्टअप आणि पेटंट फाइल
व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाने कृषी ॲग्राेटेक इंजिनिअरिंग (केआरआयएटीई-क्रिएट) या नावाने स्टार्टअप सुरू केले आहेत. याअंतर्गत ऑगस्ट २०२२ मध्ये भरडधान्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचे पेटंटही फाइल केले असल्याचे प्रा. मांडवगणे यांनी सांगितले.
ऑनलाइन उपलब्ध
सध्या मिलेट्सचे हे ‘रेडी टू इट’ पदार्थ व्हीएनआयटीमध्ये उपलब्ध आहेत. यासाेबतच स्वराज्यम या ऑनलाइन पाेर्टलवरही हे पदार्थ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मिलेट्समध्ये सर्व प्रकारच्या पाेषक घटकांचा समावेश असून ते आराेग्यदायी आहेत. याद्वारे मधुमेह, हृदयराेग, किडनीचे आजार, कर्कराेग अशा विविध आजारांना दूर ठेवता येते. हे महत्त्व ओळखूनच युनाेकडून २०२३ ला ‘आंतरराष्ट्रीय मिलेट्स इअर’ साजरे करण्याला मान्यता मिळाली आहे. त्यावरच आम्ही काम करताे आहे.
- प्रा. सचिन मांडवगणे, विभागप्रमुख, रसायन अभियांत्रिकी विभाग, व्हीएनआयटी.