लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिना आणि जुलैच्या दोन आठवड्यात पावसाने दगा दिल्यामुळे तूर आणि चण्यासह कडधान्याच्या पिकांना फटका बसणार आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षी तूर आणि चण्याचा साठा मोठ्या प्रमाणात केला होता. पण सरासरी पाऊस न आल्यास यावर्षी डाळींसह कडधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारकडे मुबलक साठाइतवारी धान्य बाजार सीड्स अॅण्ड गे्रन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, पुढे पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुहेरी पेरणीचे संकट येणार आहे. गेल्यावर्षी देशात जुलैमध्ये ४५.७५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यावर्षी ३४.२५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पण पुढे पीक किती निघेल, हे पावसावर अवलंबून आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने डाळींच्या कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात साठा केला आहे. पीक कमी झाल्यास केंद्र उपलब्ध साठा बाजारात आणून किमती वाढू देणार नाही. त्यानंतरही भाव वाढल्यास सरकार निर्यातीवर निर्बंध आणून मुबलक साठा देशात उपलब्ध करून देईल.तीन वर्षांपूर्वी तूर डाळ २०० रुपये आणि चणा डाळ १५० रुपयांवर गेल्यानंतर केंद्र शासनाने तूर आणि चणा विदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने नाबार्डच्या माध्यमातून आयात आणि बाजारातून कच्चा माल खरेदी करून साठा केला. गेल्यावर्षी केंद्राकडे ३० लाख टन चणा आणि तुरीचा साठा होता. आता जवळपास १३ लाख टन शिल्लक असल्याचे मोटवानी म्हणाले.आयातीवर निर्बंध, तूर डाळीचे भाव वाढणार नाहीतदेशात व्यापाऱ्यांनी साठा करू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने चणा, तूर, मूग, उडद, मटर आदींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावले आहेत. पूर्वी तुरीसाठी २ लाख टन असलेले निर्बंध १ जुलैपासून ४ लाख टनावर नेले आहेत. त्यामुळे जास्त प्रमाणात तूर आयात होऊन डाळ मिलला मिळाल्यानंतर भाववाढीची शक्यता नाही. यावर्षी देशातील परवानाधारक व्यापाऱ्यांना एकत्रितरीत्या १.५० लाख टन मूग, १.५० लाख टन उडद, १.५ लाख टन मटर आयात करता येईल. १ जुलैपासून मूगाचा वायदा बाजारात समावेश केल्यामुळे सट्टा प्रवृत्ती वाढणार आहे. त्यामुळेच क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये भाव वाढले आहेत. पूर्वी व्यापारी आयात करून माल साठवून ठेवायचे, पण आता परवानाधारकाला परवानगी असल्यामुळे सट्टा प्रवृत्तीला आळा बसणार आहे.डाळींचे उत्पादन वाढलेतीन वर्षांपूर्वी तूर डाळ २०० रुपयांवर गेल्यानंतर शेतकºयांनी तूर आणि चण्याची जास्त प्रमाणात लागवड केली. त्यामुळे तूर आणि चणा डाळीचे भाव अर्ध्यापेक्षा कमी झाले. तीन वर्षांपूर्वी देशात २.४० लाख टन डाळींची खपत होती. त्या तुलनेत उत्पादन जवळपास १.८० लाख टन होते. उर्वरित ५० ते ६० लाख टन आयात करावी लागत होती. पण दोन वर्षांपूर्वी उत्पादन विक्रीच्या तुलनेत जास्त झाले आहे. त्यामुळे आता डाळींसाठी कच्चा माल आयात करावा लागत नाही.मोठ्या कंपन्यांमुळे व्यावसायिकांना फटकाटाटा, महिन्द्र, पतंजली आदींसह अन्य कंपन्या डाळी आणि कडधान्य पॅकिंग करून मॉलमध्ये विकत आहे. त्याचा लहान व्यावसायिकांना फटका बसला आहे. यामुळे लहान व्यावसायिकांचा जवळपास ३० ते ४० टक्के व्यवसाय हिरावला आहे.