‘मिलिटरी लॉ’ अभ्यासक्रमाला देणार संलग्नीकरण : लवकरच होणार सामंजस्य करारनागपूर : सैन्यदलाच्या कामठी ‘कॅन्टोन्मेन्ट’मध्ये जवान व अधिकाऱ्यांसाठी ‘मिलिटरी लॉ’चा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. परंतु त्यांना कुठलेही मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या अभ्यासक्रमाला विद्यापीठ संलग्नीकरण देणार असून सैन्यातील जवान व अधिकाऱ्यांना परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच सामंजस्य करार होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. कामठी ‘कॅन्टोन्मेन्ट’मध्ये देण्यात येणारे कायद्याचे हे प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या सेवाकाळात फायद्याचे असते. यापूर्वी देशात चार विद्यापीठांसोबत सैन्याने या किंवा तत्सम अभ्यासक्रमाबाबत संलग्नीकरण मिळविले आहे. नागपूर विद्यापीठासोबत अशा प्रकारचा सामंजस्य करार होऊ शकतो याची चाचपणी करण्यात आली. कुलगुरूंनी याला सकारात्मकता दर्शवली. या करारासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी आवश्यक असते. यासंदर्भात प्रस्ताव विद्यापीठाने मंत्रालयाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतील सामंजस्य करार करण्यात येईल. याबाबतची इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच या अभ्यासक्रमाला विद्यापीठाचे संलग्नीकरण मिळेल, असे कुलगुरूंनी सांगितले.(प्रतिनिधी)
विद्यापीठ देणार सैन्य अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र
By admin | Published: January 14, 2016 3:42 AM