वाडीतील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला फसवल्याचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट दस्तावेजावर वाहन कर्ज घेऊन वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला १० लाखांनी चुना लावणारा ठगबाज दर्शन कॉलनी येथील रहिवासी भूषण नंदकिशोर चरडे याचा जामीन अर्ज पुन्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. याच आरोपीचा इंडियन ओव्हरसीज बँकेला १ कोटी ७४ लाख रुपयांनी फसवल्याप्रकरणी ८ जून रोजी जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. भूषण चरडे, त्याचे साथीदार मोहम्मद अब्दुल जावेद मोहम्मद अब्दुल रशीद (३०) रा. कळमना, शाहीद अहमद खान आणि राहुल मेश्राम रा. सुभाषनगर यांनी १२ सप्टेंबर २०१४ ते १२ मे २०१७ या दरम्यान दत्तवाडी शाखेच्या विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत चारचाकी वाहनाकरिता बनवाट कर्ज प्रकरण दाखल करून १० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. एमएच-४९-यू-१०२३ क्रमांकाचे ‘फोर्स वन’ वाहन खरेदी केल्याची बनावट कागदपत्रे, आर.सी. बुक, इन्श्युरन्सबँकेत सादर केले होते. प्रत्यक्षात कोणतेही वाहन खरेदी न करता सेंट्रल प्रोव्हिन्स मोटर्स या बनावट कार शोरूमच्या नावाने बँकेतून १० लाखांचा डीडी प्राप्त केला होता. सीताबर्डीतील कॅनरा बँकेत मोहम्मद जावेद, भूषण चरडे आणि शाहीद अहमद यांनी या कार शोरूमच्या नावे संयुक्त खाते उघडून त्यात डीडी जमा करून रक्कम आरटीजीएसद्वारे वळती करून फसवणूक केली होती. विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सचिन देवतळे यांच्या तक्रारीवर वाडी पोलीस ठाण्यात १२ मे २०१७ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२०(ब) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद जावेद आणि भूषण चरडे यांना २८ जानेवारी २०१७ रोजी इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल इंडियन ओव्हरसीज बँक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. वाडी पोलिसांनी या दोघांना १७ मे २०१७ रोजी मध्यवर्ती कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटवर अटक करून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता. कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भूषण चरडे याने जामिनासाठी अर्ज केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील श्याम खुळे तर आरोपीच्या वतीने अॅड. शीतल देशपांडे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. जाधव हे आहेत.
चरडेचा पुन्हा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: June 18, 2017 2:14 AM