लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात लवकरच प्राध्यापक भरती करण्यात येईल, असे उच्च व शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, राज्यात हजारो पदे रिक्त असतानाही राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीसाठी काहीच पावले न उचलण्यात आल्यामुळे ही प्राध्यापक मंडळी निराश झाली आहेत. महागाई वाढत असताना तुटपुंज्या मानधनावर त्यांना समाधान मानावे लागत आहे. ऑनलाइन वर्गांत अनेकांना संधीच न मिळाल्यामुळे अक्षरश: एका प्राध्यापकाने तर चहाची टपरी चालविण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणाप्रति शासन गंभीर असेल, तर तातडीने प्राध्यापक भरतीला सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरती झालेली नाही. अनेक अनुदानित महाविद्यालयांत पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून बहुतांश ठिकाणी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या भरवशावर वर्ग सुरू होते. आज ना उद्या पदभरती होईल व संधी मिळेल, या अपेक्षेने हे प्राध्यापक वर्षानुवर्षे काम करत आहेत. मात्र, शासनाच्या अनास्थेचा त्यांना फटका बसला आहे. नाईलाजाने घरखर्च भागविण्यासाठी काही जणांनी इतर छोटे व्यवसाय टाकले, तर एका प्राध्यापकाला चहाची टपरी टाकावी लागली.
कोरोनामुळे अडचणीत वाढ
विद्यापीठात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना अनेक महिने मानधनच मिळत नाही. महाविद्यालयांतही अशीच स्थिती आहे. कोरोनामुळे तर ऑनलाइन वर्ग सुरू झाले व अनेकांना बोलविण्याचे महाविद्यालयांनी टाळले. त्यामुळे मिळणारे मानधनही बंद झाले, अशी स्थिती आहे.
उच्चशिक्षणाचा फायदा काय?
तासिका तत्त्वावर कार्य करणारे अनेक प्राध्यापक नेट-सेटपैकी एक परीक्षा उत्तीर्ण आहेत. काही जणांना तर पीएच.डीही मिळाली आहे, परंतु त्यांना भरतीअभावी तासिका तत्त्वावरच काम करावे लागत आहे. जर वर्षाला काही हजारांचीच कमाई होणार असेल, तर अशा उच्चशिक्षणाचा फायदा तरी काय, असा सवाल ते उद्विग्नतेतून उपस्थित करत आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची मिळकत जास्त असते. नैराश्यातून अनेक प्राध्यापकांनी तर त्यांचे क्षेत्रच बदलले आहे.
निष्क्रिय सरकारला जाग कधी येणार?
तासिका तत्त्वाची प्रथा ही उच्चशिक्षणाला लागलेली कीड आहे. आज आम्ही नेट-सेट, पीएच.डी यांसारख्या मोठ्या पदव्या प्राप्त करूनही तुटपुंज्या मानधनावर आम्ही काम करतो आहे. तेही दोन-दोन वर्षे मिळत नाही. तासिका तत्त्व प्रणालीमध्ये कुठल्याही कामगार कायद्याचे पालन केले जात नाही. म्हणूनच आमच्यापैकी बरेच पात्रताधारक आपला चरितार्थ चालण्यासाठी आज मजुरीवर जात आहेत, कोणी रोजगार हमीवर काम करत आहे, तर कुणी आपली चहाची टपरी टाकली आहे, परंतु अजूनही निष्क्रिय सरकारला जाग आलेली नाही.
- डॉ.विवेक कोरडे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक.
नेहमीच दाखविली केराची टोपली
सीएचबी तत्त्वावरील नोकरीत मिळणाऱ्या मानधनात प्राध्यापकांना स्वत:चा खर्चही भागविता येत नाही. अनेक जण उच्चशिक्षित असल्याने लहानमोठी कामे करायलाही समोर येत नाहीत. कोरोना महामारीची ढाल वापरून राज्य सरकारने प्रत्येक वेळी प्राध्यापक भरतीला केराची टोपलीच दाखविली. २०२०च्या सर्वेक्षणानुसार, राज्यात विविध महाविद्यालयांमध्ये ७० टक्के पदे रिक्त असताना, ४० टक्के भरतीचे आश्वासन का देण्यात आले.
-डॉ.प्रमोद लेंडे खैरगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना.