लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : माेबाईल फाेनच्या सुट्या भागाची विक्रीची रक्कम घेऊन भिवापूरहून नागपूरला परत येत असलेल्या व्यक्तीला उमरेड-नागपूर मार्गावरील उटी शिवारात तिघांनी अडविले. त्यांना दगडाचा धाक दाखवून त्यांच्याकडील १३ हजार ३०० रुपये हिसकावून पळ काढणाऱ्या लुटारूंना कुही पाेलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि. ९) रात्री घडली असून, आराेपींना शनिवारी (दि. १०) मध्यरात्री अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शेख रिजवान शेख (२२, रा. बहादुरा फाटा, नागपूर), माेहम्मद अताकला शेख (२१, रा. चामट चाैक, नागपूर), सुनान सलीम शेख (१८, रा. आझाद काॅलनी, नागपूर) व ज्ञानेश्वर बाबुराव भुजाडे (२७, रा. भिवापूर) या चाैघांचा समावेश आहे. भेराराम जाेराराम चाैधरी (३१, रा. महाल, नागपूर) हे माेबाईल फाेनचे सुटे भाग विकण्याचा व्यवसाय करतात. ते शुक्रवारी भिवापूर येथे वसुली करून माेटरसायकलने नागपूरला परत जात हाेते. दरम्यान, या मार्गावरील उटी शिवारात मागून विना क्रमांकाच्या माेटरसायकलने आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. यातील एकाने त्यांना दगडाचा धाक दाखविला तर दुसऱ्याने त्यांच्या खिशातील १३ हजार ३०० रुपये हिसकावून घेतले आणि तिघेही पळून गेले.
याबाबत त्यांनी कुही पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली हाेती. त्याअनुषंगाने कुही पाेलिसांनी भादंवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. ही वाटमारी शेख रिवान शेख याने केल्याची माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत इतरांची नावे सांगितली. त्यामुळे या पथकाने इतर तिघांनाही त्यांच्या घरून ताब्यात घेत चाैघांनाही अटक केली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत मदने करीत आहेत.