नागपूर - हताश निराश झालेल्या चार तरुणांनी वेगवेगळ्या भागात गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, यातील एकाने सुसाईड नोट लिहून कुटुंबासाठी काहीच करू शकलो नाही, याची खंतही व्यक्त केली.
अनिकेत वसंतराव बावनकुळे (वय ३०) नामक तरुण अजनीच्या बजरंगनगरातील रहिवासी होता. त्याचे वडील घरीच किराणा दुकान चालवितात. तर, पत्नी ब्युटी पार्लरचे काम करते. अनिकेत एका गॅस एजन्सीत काम करायचा. मनासारखी मिळकत नसल्याने मनासारखे जीवन जगता येत नसल्याची भावना झाल्याने अनिकेतला नैराश्याने घेरले होते. त्यामुळे त्याने शनिवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अनिकेतने सुसाईड नोट लिहून आपली अगतिकता नमूद केली. आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, असेही नमूद केले. माहिती कळाल्यानंतरअजनीचे हवालदार सुनील तिडके यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
मोमीनपुऱ्यातील डोबीनगरात राहणारा मोहम्मद फुरकान (वय २४) यानेही शनिवारी दुपारी गळफास लावून घेतला. लकडगंजमधील गंगाबाई घाट सिद्धार्थ बाैध्दविहाराजवळ राहणारे तुळशीराम बाळकृष्ण रोकडे (वय ५६) यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून घेतला तर पारडीच्या रामभूमी सोसायटीत राहणारे अनिल बाबूराव रुद्रकार (वय ४०) यांनी रविवारी दुपारी गळफास लावून घेतला.
-----