नागपूर : राज्यात रखडलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे सोमवारी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. अनेकांनी संविधान चौकातदेखील आंदोलन केले.
राज्यात १८ हजाराहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे. लवकरात लवकर भरती सुरू करण्यात येईल. तसेच वित्त विभागाने ४० टक्के प्राध्यापक भरतीसाठी मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. मात्र त्याची पूर्तता झालीच नाही. शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत भरतीचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.