लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने ११ ते १७ जानेवारीपर्यंत साखळीबद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
शेतकरी हिताच्या विरोधातील कायदे रद्द करा, या मागणीसह व्ही.व्ही.पी.ए.टी. मशीनमधून निघणाऱ्या कागदी मतपत्रिकांची १०० टक्के मोजणी व्हावी, या मागणीचाही यात समावेश होता. राष्ट्रीय किसान मोर्चाचे नागपूर जिल्हा संयोजक अनिल बोडखे यांनी या आंदोलनाला सहकार्य केले. देवेंद्र निलमवार, हेमलता पाटील, माधुरी गजभिये, गणेश चौधरी, ईश्वर खैरगडे, बसु कळमेश्वर आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. धर्मेश मडामे, अशोक घोरपडे, रमेश रंगारी, सचिन सोयाम, चंद्रमणी चहारे, राम बुरबुरे आदींनी परिश्रम घेतले. संचालन अनिल नागरे यांनी तर आभार सन्नी सहारे यांनी मानले.