लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्दच्या नशेसाठी चेन स्नॅचिंग व वाहन चोरणाऱ्या कामठीतील इराणी टोळीच्या एका सदस्याला शांतिनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून चेन स्नॅचिंग व वाहन चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या. शाहीद अली गुलाम अली (२८) रा. न्यू येरखेडा, कामठी असे आरोपीचे नाव आहे.
शाहीद हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला गर्दची नशा करण्याचे व्यसन आहे. यासाठी तो वाहन चोरी व सोनसाखळी लुटतो. तो २३ एप्रिल रोजी सतरंजीपुरा झोन कार्यालयासमोर आपल्या मैत्रिणीशी बोलत असलेल्या निकिता बिहुनिया यांचे मंगळसूत्र हिसकावून फरार झाला होता. या प्रकरणात पोलिसांना शाहीदचा हात असल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेतला असता तो एका ऑटो चालकाशी वाद घालताना सापडला. त्याला पोलीस कोठडीत घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला. याशिवाय त्याने शांतिनगरसोबतच हुडकेश्वर व मानकापूर येथेसुद्धा सोनसाखळी आणि जरीपटका व भिवापूर येथून बाईक चोरल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून २.५७ लाखाचा माल जप्त करण्यात आला.
शाहीद हा चोरलेले दागिने व बाईक लगेच विकून टाकायचा. नातेवाईक कोविडग्रस्त असून पैशाची गरज असल्याने दागिने व वाहन विकत असल्याचे कारण सांगायचा. त्यामुळे कुणी त्याच्यावर संशयही घेत नसे. पोलिसांनी जेव्हा शाहीदच्या नातेवाईकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी शाहीदशी कुठलेही संबंध नसल्याचे सांगितले. शाहीदच्या टोळीत चार ते पाच सदस्य आहेत. ताजी घटना त्याने एकट्यानेच केली असल्याचे सांगत आहे. ही कारवाई पीआय जी.जे. जामदार, पीएसआय अरुण बकाल, कर्मचारी प्रकाश पखान, विनोद समदुरे आणि प्रवीण जाधव यांनी केली.