लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळू पाहणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडून संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. रूपेश नंदकिशोर पांडे (वय २६)असेे त्याचे नाव असून तो जालना येथील गायत्रीनगरातील रहिवासी आहे. त्याचा अनुराग सुनील बोरकर नामक साथीदार मात्र पळून गेला.
आश्लेषा अनिरुद्ध देशमुख या हनुमाननगरात राहतात. बुधवारी रात्री त्या त्यांच्या भावाच्या महालमधील घरून निघाल्या. वॉकर रोडवरून जात असताना आरोपी रूपेश आणि अनुराग त्यांच्याजवळ आले. त्यांनी देशमुख यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. यावेळी रात्रीचे ७ वाजले होते. रस्त्यावर चांगली वर्दळ होती. देशमुख यांनी आरडाओरड करताच आरोपी पळू लागले. जमावानेही त्यांचा पाठलाग सुरू केला. रूपेश हाती लागताच संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली. कोतवाली पोलिसांनी आरोपी रूपेशला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून नंतर त्याचा पळून गेलेला साथीदार अनुराग यालाही पोलिसांनी गुुरुवारी अटक केली.
कारागृहातून सुटला अन्...
आरोपी रूपेश पांडे हा सराईत गुन्हेगार असून तो मूळचा जालना येथील रहिवासी असला तरी अनेक वर्षांपासून तो नागपुरातच राहतो. शांतिनगरात त्याने आपला ठिय्या जमवला आहे. त्याच्याविरुद्ध चेनस्नॅचिंग तसेच चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठवड्यातच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला आणि त्याने लगेच पुन्हा गुन्हेगारी सुरू केली.