नागपूर : नागपुरात येऊन चेनस्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना ओडिशातून अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
२८ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आशा थुल (६५, साकेतनगरी) या डेली नीड्सच्या दुकानात असताना एका मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांना शीतपेयाची बाटली मागितली. मात्र बाटली थंड नसल्याचे सांगत त्यांना काऊंटरवर बोलविले. त्यानंतर दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावत पळ काढला. बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू असताना त्याच दिवशी बेलतरोडी, सक्करदरा, हुडकेश्वर, तहसील व सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा चेनस्नॅचिंगच्या घटना झाल्याची बाब समोर आली. पथकाने सर्व गुन्ह्यांची माहिती एकत्रित केली. तांत्रिक तपास व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला.
यात ओडिसातील न्यू आपाडा जिल्ह्यातील खरीया रोडी येथील जाफर अली भोलू अली तसेच जहीर हुसैन उर्फ मोहम्मद बिहारी हे सहभागी असल्याची बाब समोर आली. पोलीस त्यांना अटक करण्यासाठी ओडिसाकडे रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला व दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना नागपुरात आणले व चौकशी करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४.०८ लाखांचे दागिने व नंबरप्लेट नसलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
नागपुरातून येऊन हेरायचे सावज
या दोन आरोपींसोबत न्यू आपाडा जिल्ह्यातील धोबीपारा येथील हैदर अली अकरम अली हादेखील त्यांचा साथीदार होता. तोदेखील त्यांच्यासोबत नागपुरात आला होता. हे तिघेही ओडीसातून नागपुरात यायचे व त्यानंतर गुन्हे करून परत जायचे. हैदर अली हा वाहन चालवायचा.
ओडिसात २१ गुन्हे दाखल
जहीर हुसैन उर्फ मोहम्मद बिहारी हा अट्टल चेनस्नॅचर असून ओडिसा राज्यात विविध पोलीस ठाण्यांत त्याच्याविरोधात २१ गुन्हे दाखल आहे. पोलीस निरीक्षक रमेश ताले, वैभव बारंगे, नाजीर शेख, निलेश ढोणे, सतिश ठाकरे, युवानंद कडू, आशीष क्षीरसागर, पुरुषोत्तम जगनाडे, चेतन गेडाम, अजय पौनीकर, अनंता क्षीरसागर, महेश काटवले, सत्येंद्र यादव, लिलाधर भेंडारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.