नागपूर : विदर्भाच्या मातीतून जन्मलेले आणि गेली सलग ५० वर्षे निरंतर लोकजागरासाठी वाहून घेतलेले ‘लोकमत’ आज १५ डिसेंबर रोजी आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या वर्धापन दिनानिमित्त लाखो नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीच्या चरणी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते आज सकाळी ५० किलोंचा लाडू अर्पण करण्यात आला.
१५ डिसेंबर १९७१ रोजी स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यांनी नागपुरातून ‘लोकमत’ची मुहूर्तमेढ रोवली. यवतमाळच्या मातीतून निपजलेले हे रोपटे ५० वर्षांत वटवृक्षात रूपांतरित झाले. महाराष्ट्रभर त्याच्या पारंब्या पसरल्या. वितरणापासून तर सुबक अंक-छपाईपर्यंतचे सर्व विक्रम तोडून लोकमत ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ झाले. समाजाच्या संवेदना टिपत महाराष्ट्रव्यापी झालेला लोकमत आणि वाचकांसाठी हा आनंदाचा दिवस आहे.
विदर्भात सजणार रांगोळ्या
‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकमत सखी मंच आणि प्रेरणा सेवा मंडळ संचालित प्रेरणा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १५ डिसेंबरला बुधवारी विदर्भस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. विदर्भातील महिला, युवती आणि सखी मंचच्या सदस्या यात सहभागी होत असून जणू विदर्भाचे अंगणच या स्पर्धेतून मनमोहक रांगोळ्यांनी सजणार आहे. ‘लोकमत सुवर्ण महोत्सव १९७१-२०२१’ असा उल्लेख करून आणि त्यावर एक पणती लावून विदर्भातील भगिनीही या निरंतर लोकजागराचा आज विदर्भामध्ये सुवर्णमहोत्सव ! आनंदोत्सवात सहभागी होत आहेत.
सर्वधर्म समभाव परिषद
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत सामाजिक सद्भावनेचा संदेश देत नागपुरात २५ ऑक्टोबरला ‘लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद’ आयोजित करण्यात आली होती. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे धर्मगुरू ब्रह्मविहारी स्वामी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल्ड ओसवाल्ड ग्रेसियस, जीवन विद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, लेह-लडाख येथील महाबोधी आंतराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिक्खू संघसेना या जागतिक पातळीवरील धर्मगुरूंनी ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर झालेल्या परिसंवादातून देशाला सामाजिक सद्भावनेचा संदेश दिला होता.