लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपुरातही आंदोलन करण्यात आले. इंदोरा चौकात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करीत रास्ता रोको करण्यात आला. कामठी रोड जाम झाल्याने वाहतूक वळवण्यात आली. बोरखेडी टोल नाक्यावरही रास्ता रोको करण्यात आला. संविधान चौकातही विविध संघटनांनी निदर्शने, धरणे आंदोलन करीत शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. तसेच केंद्र सरकारने केलेले शेतकरी कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली.
दिल्ली येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकरी आंदोलन समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी इंदोरा चौकात आंदोलन पुकारण्यात आले होते. यात विविध सामाजिक व राजकीय संघटना सहभागी झाल्या होत्या. दुपारी १२ वाजेपासून आंदोलन सुरू झाले. आंदोलनकर्त्यांनी इंदोरा चौकातच ठाण मांडल्याने कमठी रोड पूर्णपणे जाम झाला होता.
संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार संविधान चौकातही विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांवर पोलीस अत्याचार बंद करा, किसानविरोधी शेतकरी कायदे वापस घ्या तसेच शेतीमध्ये सरकारी गुंतवणूक वाढवा व शेती उद्योगपतींच्या हवाली करणे बंद करा, या मागण्या प्रदर्शनाद्वारे करण्यात आल्या.
आंदोलनात अरुण लाटकर, मनोहर मुळे, रामेश्वर चरपे, मधुकर भरणे, मोहम्मद ताजुद्दीन, दिलीप देशपांडे, विलास जांभूळकर, सुभाष रामटेके, विजया जांभूळकर, स्नेहलता जांभूळकर, वैशाली केडिया, ॲड. विजय फुलकर यांच्यासह विविध संघटना व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बॉक्स
आम आदमी पार्टीचाही चक्का जाममध्ये सहभाग
शेतकरी आंदोलन समन्वय समितीने इंदोरा चौकात चक्का जाम केला. यात आम आदमी पार्टीही सहभागी झाली होती. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात जगजित सिंह, अमरीश सवारकर, कृतल वेलेकर, कविता सिंघल, आकाश सपेलकर, शंकर इंगोले, पीयूष आकरे, भूषण ढाकूलकर, डॉ शाहिदअली जाफरी, राकेश उराडे, अध्यक्ष गिरीश तीतरमारे व रोशन डोंगरे, हरीश गुरबानी, सुरेश चतुरवेदी, विश्वजित मसराम, विजय नंदनवार, मयंक यादव, प्रदीप पैनीकर, विजय धकाते, विक्की ठाकरे, बबलू भाई, अलका पोपटकर, गुल्लू बेहरा, विकास घरडे, शकील खान, गुणवंत सोनकुवर आदी सहभागी झाले होते.
बोरखेडी टोल नाक्यासमोर रास्ता रोको
संयुक्त किसान मोर्चा आवाहनानुसार शनिवारी विविध संघटनांच्या वतीने दुपारी एक वाजता बोरखेडी टोल नाक्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नेते अरुण वनकर, दुर्योधन मसराम, गंगाराम खेडकर, जय जवान जय किसान संघटनेचे अभिनव फटीग, आशुतोष पाठक यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शंभरच्या वर शेतकरी सहभागी झाले होते.
टोल नाक्यावर रास्ता रोको करण्यात आल्याने हैदराबाद हायवेवर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. जवळ जवळ एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. आंदोलनात कवठा, दुधा, मांडली, मोहगाव, बामनी, तारसी, मसाळा, शेडेश्वर, बुटीबोरी या गावांतील सुनील हांडे, रंगलाल परतेती, किंमत मडावी, राजू खडाते, गजानन पेदाम, महाराणी सयाम, सुनील पत्रे, किरष्णा खुरसगे, नाविक खंडाते, हरी चौधरी, चेतन आचरे,संदीप बाहे, श्रावण खुरसगे, संगम दिवे, दिवाकर कुमरे, देवनाथ मसराम, बजरंग कुमरे, सुधाकर कन्नाके, परिसरात मसराम, सखाराम मडावी, विठ्ठल सोनटक्के, श्रीराम मसराम, शत्रुघ्न उईके, ओमनाथ तरवटकर, प्रकाश डोंगरे,. रवि टेभुर्णे, संजय राऊत, जनता दल सेक्युलरचे रमेश शर्मा, डॉ. विलास सुरकर, मुन्ना शेख, विजय खोब्रागडे आदींचा समावेश होता.
कामठी रोडवरील वाहतूक वळवली
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. कामठी रोड व ऑटोमोटिव्ह चौकाकडून येणारी वाहने ही थेट इंदोरा चौकाकडे न येता, ती ग्रामीण पोलीस मुख्यालयामार्गे वळविण्यात आली होती.