नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:02 PM2019-06-27T23:02:10+5:302019-06-27T23:03:06+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या पदासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदार डॉ. वंदना इंगळे यांनी रिट याचिकेद्वारे हे आव्हान दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या पदासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदार डॉ. वंदना इंगळे यांनी रिट याचिकेद्वारे हे आव्हान दिले आहे.
याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. जी. एस. खेडकर, सचिव प्रदीप बिन्नीवाले व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, वादग्रस्त नियुक्ती प्रक्रिया याचिकेवरील निर्णयाधीन राहील असे स्पष्ट केले.
नागपूर विद्यापीठाने या पदासाठी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार इंगळे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, पात्रता व अनुभवाच्या निकषात बसत नसल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. तो निर्णय चुकीचा असल्याचे इंगळे यांचे म्हणणे आहे. अर्ज फेटाळताना रेकॉर्डवरील पुरावे योग्य पद्धतीने विचारात घेण्यात आले नाही. पडताळणी समितीने वाईट हेतूने अर्ज फेटाळला. यासंदर्भात निवेदने सादर केली असता, त्याची दखल घेण्यात आली नाही असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. डॉ. माधवी मार्डीकर व डॉ. शरद सूर्यवंशी यांना या पदासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. खरे पाहता ते दोघेही अपात्र आहेत असेदेखील इंगळे यांनी नमूद केले आहे. नियुक्ती प्रक्रि येचा संपूर्ण रेकॉर्ड मागविण्यात यावा व नवीन पडताळणी समिती स्थापन करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. इंगळे यांच्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.