योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकांना काही महिने बाकी राहिले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून संघटन प्रणाली मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषत: विधानसभा निवडणुकीत हातातून गेलेल्या दोन जागा व पदवीधरच्या निकालानंतर भाजपने ताकदेखील फुंकून पिण्याचे ठरविले आहे. बूथप्रणाली सक्षम करण्यावर संघटनेतर्फे भर देण्यात येत असून, काही भाग अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर नागपूर व मुस्लिमबहुल भागात बूथप्रमुख नेमण्याचे आव्हान शहर पदाधिकाऱ्यांसमोर आहे.
लोकसभा निवडणुकांच्या अगोदर भाजपने शहरात बूथ विस्तारक योजना राबविली होती. या माध्यमातून बूथप्रमुख व विस्तारकांनी प्रत्येक बूथवर संपर्क केला होता. शहरात सुमारे दोन हजार ३५ बूथ आहेत. यांतील सर्व बूथवर प्रमुख नेमून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. पक्षाने बूथनिहाय कार्यकारिणी तयारदेखील केली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी घोषणा झालेली नाही. काही ठिकाणी नेमलेले प्रमुख हवे तसे काम करीत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिवाय उत्तर नागपूर व मुस्लिमबहुल भागात बूथप्रमुख नेमण्यात अडचणी येत आहेत. अगदी दक्षिण-पश्चिम नागपुरातील दोन डझनांहून अधिक बूथवर प्रमुख नाहीत किंवा कार्यकारिणी नाही अशी स्थिती आहे. शहरातील सहाही मतदारसंघातील सुमार पावणे दोनशे बूथवर बूथप्रमुख किंवा कार्यकारिणी नेमण्यात आलेली नाही. वरील भागांमध्ये बूथप्रमुख व कार्यकारिणी नेमणे हे पक्षासमोरील मोठे आव्हान असल्याची भावना पक्ष पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
कोरोनामुळे कार्यकर्तेदेखील अस्वस्थ
कोरोनामुळे अनेकांची आर्थिक गणिते बिघडली असून काही पदाधिकारी व कार्यकर्ते व्यवसाय पूर्वपदावर आणण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे पक्षाकडे हवा तसा वेळ देऊ शकत नसल्याचे वास्तव आहे. कोरोनामुळे जनतेचा काही नगरसेवकांवर रोष आहे. अशा स्थितीत बूथपातळीवर कार्यकर्त्यांचा संपर्क वाढविण्यावर पक्षाचा भर असताना काही ठिकाणी येणाऱ्या अडचणीवर चिंतन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच नेमणुका होणार
या संदर्भात शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांना संपर्क केला असता शहरातील दीडशेहून अधिक बूथवर प्रमुख किंवा कार्यकारिणी नसल्याच्या बाबीला त्यांनी दुजोरा दिला. पक्षाचा तळागाळापर्यंत पोहोचण्यावर भर आहे. कोरोनामुळे आमचा भर जनसेवेवर होता. लवकरच उर्वरित बुथवर नेमणुका होतील व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.