'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:30 AM2019-07-20T10:30:14+5:302019-07-20T16:19:57+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो.
योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो. येत्या विधानसभा निवडणुकांत भाजपाकडून मुख्यमंत्री येथून लढतील असेच अंदाज लावण्यात येत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु मतदारसंघात असलेल्या गटबाजीचा सामना करण्याचे मोठे आव्हानच कॉंग्रेससमोर राहणार आहे.
२००९ साली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची निर्मिती झाली. पश्चिम नागपुरातील बराचसा भाग यात आला व यात प्रामुख्याने पांढरपेशा वस्ती अशी ओळख असलेल्या भागाचे प्रमाण मोठे होते. सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव अंतिम मानण्यात येत आहे. इतर कुठल्याही नेत्याने तेथे उमेदवारीसाठी दावादेखील केलेला नाही. परंतु जर ऐनवेळी पक्षाने मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून निवडणूक लढावी असे ठरविले तर मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो.
कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनाच परत उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसकडून कुमार बोरकुटे, उमेश शाहू, गणेश कश्यप, डॉ.गजराज हटेवार यांनीदेखील अर्ज घेतले आहेत. आता यातील नेमके किती जण प्रत्यक्ष उमेदवारीसाठी दावा करतात हा प्रश्नच आहे. परंतु या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी हा कॉंग्रेससमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. २०१७ मधील मनपा निवडणुकांत प्रभाग ३८ मध्ये लढण्यासाठी प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दावा केला होता. त्यामुळे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना दुसºया प्रभागातून लढावे लागले. निवडणुकीला दोन वर्ष झाली असली तरी पक्षात अंतर्गत धुसफूस कायमच आहे. त्यामुळे विधानसभेसाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकजूट करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.
याशिवाय बसपाकडूनदेखील या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. बसपाकडून उषा बौद्ध, अशोक डोंगरे, विवेक हाडके, नवनीत धाबाडे, सदानंद जामगडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
‘ग्रॅन्ड हॅट्ट्रिक’साठी प्रयत्न
देवेंद्र फडणवीस हे सातत्याने चार वेळा विधानसभा निवडणुकात विजयी झाले असले तरी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील ही त्यांची तिसरी निवडणूक राहणार आहे. मतदारसंघातील पहिल्याच निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी २७ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता तर २०१४ मधील निवडणुकांत ते ५८ हजार ९४२ मतांनी निवडून आले होते. लोकसभा निवडणुकांत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना या मतदारसंघात ५५ हजार ११६ इतके मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत आणखी वाढावी व येथे ‘ग्रॅन्ड हॅट्ट्रिक’ व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. संघटन पर्वाच्या माध्यमातून नवीन मतदारनोंदणीवरदेखील भर देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री स्वत: ठेवतात लक्ष
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असली तरी वेळात वेळ काढून ते दक्षिण-पश्चिम नागपुरातील समस्या, येथील विकासकार्य यावर जातीने लक्ष ठेवतात. या मतदारसंघातील पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून ते नियमितपणे आढावा घेतात. या मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले आहे. तसेच येथील मूलभूत समस्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. लोकसभा निवडणुकानंतर मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन आढावा घेतला होता व विधानसभेसाठी कार्याची दिशा ठरवून दिली होती. दुसरीकडे कॉंग्रेसकडूनदेखील या भागात जनसंपर्कावर भर देण्यात येत आहे. मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते मतदारांशी संपर्क ठेवून आहेत.