नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पूर्व नागपुरात आयोजित पक्षाच्या बैठकीत आ. अभिजित वंजारी व नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यात झालेल्या वादाने याची सुरुवात झाली आहे. गेल्या निवडणुकीत अंतर्गत वाद विकोपाला जाऊन तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. हा इतिहास पाहता गटातटात विखुरलेल्या काँग्रेससमोर भाजपपेक्षा अंतर्गत गटबाजीचेच अधिक आव्हान दिसत आहे.
गेल्या निवडणुकीत राऊत-चतुर्वेदी विरुद्ध मुत्तेमवार-ठाकरे असा सामना रंगला होता. मुंबईत एबी फॉर्म वाटपावरून मतभेद झाले
व काही जागांवर डबल एबी फॉर्म देण्यात आले. एकमेकांचे उमेदवार पाडण्यात नेत्यांनी धन्यता मानली. परिणामी महापालिकेत सत्ता परिवर्तनाची स्वप्न पाहणारी काँग्रेस फक्त २९ नगरसेवकांवर थांबली. पुढे विरोधी पक्षनेता निवडीवरूनही टोकाचा विरोध झाला. आता कार्यकर्ते सत्तेची आस लावून असताना पुन्हा एकदा नेत्यांनी भांडणे सुरू झाली आहेत. पूर्व नागपुरात पारडी येथील लॉनवर रविवारी ब्लॉक कमिटीची बैठक झाली. तीत आ. अभिजित वंजारी यांचे भाषण सुरू असतानाच माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक असलेले नगरसेवक पुरुषोत्तम हजारे समर्थकांसह दाखल झाले. आपण पूर्व नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढविली व आपल्यालाच या बैठकीला का बोलाविले नाही, असा सवाल करीत हजारे समर्थकांनी गोंधळ घातला. माइकची फेकाफेकी केली. यामुळे वंजारी यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. या वादाची चर्चा शहरभर रंगताना दिसत आहे.
दुसरीकडे संबंधित बैठकीत हजारे व आपल्यात वाद झाला नाही, असा दावा आ. वंजारी यांनी केला आहे, तर संबंधित बैठकीचा निरोप ब्लॉक अध्यक्षांनी हजारे यांना दिला होता. मात्र, तो निरोप मिळालाच नाही नाही. यातून हजारे यांचा गैरसमज झाला. त्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा केली, असेही आ. ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. येथे कुणीही आपल्या हक्कासाठी आवाज उठवू शकतो. त्याचा आवाज दाबल्या जात नाही. त्यामुळेच काँग्रेस जिवंत आहे, असेही ठाकरे यांनी या वादावर स्पष्ट केले.
नाराजीची झळ, पॅचअपचे प्रयत्न
- विधानसभा निवडणूक लढलेल्या तसेच मतदारसंघात काम करणाऱ्या काही युवा नेत्यांना प्रदेश काँग्रेसच्या यादीत स्थान मिळाले नाही. यावरून नाराजी पसरली आहे. या नाराजीची झळ मनपा निवडणुकीत बसू नये, यासाठी शहर काँग्रेसने पुढाकार घेतला असून, संबंधितांची नावे समाविष्ट करण्याची विनंती प्रदेश काँग्रेसला करण्यात येणार आहे.
ठाकरे म्हणतात पक्षाने आदेश देताच अध्यक्षपद सोडील ()
- आ. विकास ठाकरे हे गेल्या सात वर्षांपासून काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी आहेत. पक्षांतर्गत विरोधी गटाने वेळोवेळी दिल्लीवारी करून ठाकरे हटाव मोहीम राबविली. सात वर्षांत चार प्रदेशाध्यक्ष बदलतात. मात्र, शहर अध्यक्ष का बदलत नाही, असा सवाल पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित केला जात आहे. यावर पक्षाने आदेश देताच अध्यक्षपद सोडील, असे आ. ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. गेली पाच वर्षे केंद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता असताना आपण काँग्रेस कमजोर होऊ दिली नाही. आंदोलने केली. खुर्चीशिवायही मी काम करू शकतो, असे सांगत आपण पक्षाकडे अनेकदा सक्षम व्यक्तीकडे अध्यक्षपद सोपविण्याची विनंती केली असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.