योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ मानण्यात येणाऱ्या उत्तर नागपुरात काँग्रेसला गटबाजीच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उत्तर नागपुरात दलित मतदारांची संख्या मोठी आहे. येथील मतदारांनी नेहमीच रिपब्लिकन पक्ष किंवा काँग्रेसला साथ दिली आहे. परंतु २०१४ मध्ये येथे ‘कमळ’ फुलले व अंतर्गत गटबाजीने काँग्रेसला पोखरून टाकले. विधानसभा निवडणूकांत याचा सामना कॉंग्रेसला करावा लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपासमोरदेखील मतदारांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. येथे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने यांनाच उमेदवारी मिळणार की भाजपातर्फे नवीन चेहरा देण्यात येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.उत्तर नागपुरात दलितांसमवेतच पंजाबी, सिंधी, हिंदी भाषिक, कुणबी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे उमेदवार निश्चित करणे हे राजकीय पक्षांसाठी मोठे आव्हान राहणार आहे. यावेळेला काँग्रेसमधून उत्तर नागपूरसाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज घेतलेला नाही. येथून रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेले किशोर गजभिये हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत गजभिये हे बसपाच्या तिकिटावर लढले होते. याशिवाय काँग्रेसकडून नगरसेवक संदीप सहारे, प्रमोद चिंचखेडे, बंडोपंत टेंभुर्णे, महेंद्र बोरकर, मनोज सांगोळे, धरम पाटील, राकेश निकोसे, भावना लोणारे, किशोर दहीवाले यांनीदेखील या जागेसाठी अर्ज घेत दावेदारी सादर केली होती. आता यातील नेमके किती लोक प्रत्यक्ष उमेदवारीसाठी दावा करतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण लक्षात घेता, या मतदारसंघात उमेदवारीसाठी अंतर्गत स्पर्धा जोरात राहणार असून, ऐनवेळी वरिष्ठ नेत्यांनादेखील येथे मध्यस्थी करावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे आपला मुलगा कुणालसाठीदेखील प्रयत्नरत आहेत. जर राऊत यांना तिकीट देण्यासाठी कॉंग्रेसने विचार केला तर स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची नाराजी पत्करावी लागेल. भाजपाने २०१४ मध्ये डॉ. मिलिंद माने यांना तिकीट दिली होती. माने यांची स्वच्छ प्रतिमा व भाजपाचे संघटन कौशल्य यामुळे मतदारांचा कल बदलला. माने यांनी नितीन राऊत यांच्या ‘हॅट्ट्रिक’ करण्याच्या अपेक्षांना सुरुंग लावत विजय मिळविला. राऊत यांना तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले होते. या मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता डॉ.मिलिंद माने यांचा मोठा दावा आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपुरात भाजपचे मताधिक्य घटल्यामुळे आ. डॉ. मिलिंद माने अडचणीत असल्याची चर्चा आहे. जर यदाकदाचित मानेंचे तिकीट कापल्या गेले तर नगरसेवक संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम यांचा उमेदवारीवर दावा असू शकतो. वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघातून सागर डबरासे हे प्रामुख्याने इच्छुक आहेत. डबरासे यांना लोकसभेत या मतदारसंघातून ६ हजार ५७३ मतं प्राप्त झाली होती. या मतदारसंघातून सुरेश साखरे, भाऊ गोंडाने, नरेंद्र वालदे, जितेंद्र घोडेस्वार यांनी बसपाच्या ‘हत्ती’वर स्वार होण्याची तयारी चालविली आहे. उत्तरमध्ये मतदारांचे जातीय समीकरण लक्षात घेता सर्व पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यात येतील.
लोकसभेतील मतांवर उमेदवारीचे गणितलोकसभा निवडणुकांत भाजपाला उत्तर नागपुरातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. २०१४ मध्ये भाजपाने आश्चर्यकारकपणे आघाडी घेतली होती. परंतु २०१९ मध्ये केवळ या मतदारसंघात भाजपाची पिछाडी झाली व काँग्रेसला जास्त मते मिळाली. काँग्रेसच्या तुलनेत भाजपाला ८ हजार ९१० मते कमी मिळाली आहेत. ही बाब पक्षाने गंभीरतेने घेतली असून येथे नवीन मतदारनोंदणीवर भर देण्यात येत आहे. येथून नेमकी कुणाला उमेदवारी मिळेल यासंदर्भात भाजपाकडून कुठलेही संकेत देण्यात आलेले नाहीत. मात्र विविध मोहिमांअंतर्गत भाजपाने येथे संघटन मजबुतीवर भर दिला आहे.