लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ती एकटीच पॉझिटिव्ह आली. तिचा पती आणि दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्ह आला. तिला आणि चिमुकल्याला मेयोत दाखल केले. परंतु डॉक्टरांनी दोन महिन्याचा चिमुकल्याला सोबत ठेवणे धोकादायक सांगितले. चिमुकल्याला पतीकडे परत पाठविले. सोमवारी तो चिमुकला आईच्या दुधासाठी दिवसभर रडत होता. याची माहिती मेयोतील एका निवासी डॉक्टरला मिळाली. त्याने त्या महिलेचे समुपदेशन केले. टॉवेलपासून, हॅण्ड वॉश, साबन आणून दिले. विशेषत: दूध पाजताना घ्यावयाची काळजी याची माहिती दिली, आणि बाळ तिच्याकडे सुपूर्द केले. आज ती महिला आणि तिचे बाळ आनंदात आहे. दोन महिन्याच्या या चिमुकल्याला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान त्या आईने स्विकारले आहे.सतरंजीपुरा येथील पहिल्या मृताकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून आतापर्यंत ८० वर लोकांना कोरोनाच लागण झाली. यामुळे वसाहतीतील बहुसंख्य संशयितांना क्वारंटाइन केले जात आहे. यात ही महिला आणि तिचे कुटुंब आहे. हे कुटुंब सिम्बोसीस येथे होते. सुरूवातीला तिघांचे नमुने निगेटिव्ह आले. परंतु सात दिवसानंतर घेण्यात आलेले नमुन्यात तिच्या एकटीचा नमुना पॉझिटिव्ह आला. सोमवारी तिला मेयोत दाखल केले तेव्हा तिच्यासोबत चिमुकला होता. मुलाला सोबत ठेवता येणार नाही, असे सांगून क्वारंटाइन असलेल्या पतीकडे पाठविले. सोमवारी तो मुलगा दिवसभर दुधासाठी रडत होता. याची माहिती पतीने पत्नीला फोनवरू दिली. ती मुलाला दूध पाजण्यासाठी डॉक्टरकडे विनंती करीत होती. अखेर एका निवासी डॉक्टरने याची दखल घेतली. डॉक्टरने त्या महिलेला कोरोनाची आणि तो कसा पसरतो याची माहिती दिली. शरीराची, कपड्याची स्वच्छता कशी राखायचे ते सांगितले. एवढ्यावरच तो डॉक्टर थांबला नाही स्वत:च्या पैशातून टॉवेलपासून ते साबण, सॅनिटायजर आणून दिले. विशेषत: दूध पाजताना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली आणि नंतर तिच्याकडे बाळ सुपूर्द केले. त्या आईने बाळाला पदराखाली घेतले. ते दोघेही शांत झाले. त्या आईने बाळला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान स्विकारले आहे. यात त्या निवासी डॉक्टरची मदत होत आहे. गेल्या दोन दिवसापासून त्या बाळाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. निवासी डॉक्टरच्य या पुढाकाराचे रुग्णालयात सर्वत्र कौतुक होत आहे.