योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येणाऱ्या मध्य नागपूरमध्ये अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच मतदारसंघात येते व त्यामुळे ही जागा भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. जातीय समीकरणांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असली तरी येथून मागील दोन ‘टर्म’पासून भाजपाचे विकास कुंभारे हे कॉंग्रेस उमेदवारावर वरचढ ठरले आहेत. या निवडणुकीत या मतदारसंघातून ‘हॅट्ट्रिक’ करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर काँग्रेसने लोकसभेतील अपयश धुवून काढण्यासाठी गृहसंपर्काला सुरुवात केली आहे.संघाचा बालेकिल्ला व मुस्लीम मतदारांचे प्राबल्य अशी या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात हलबा, कोष्टी मतदारांचे प्रमाणदेखील उल्लेखनीय आहे. कॉंग्रेसने या मतदारसंघातून बहुतांश वेळा मुस्लीम उमेदवारच दिला आहे. यावेळेला कॉंग्रेसमधून मध्य नागपूरसाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. माजी आमदार अनिस अहमद यांचा येथून दावा आहेच. अतुल कोटेचा, नंदा पराते यांचादेखील पक्षाकडून विचार होऊ शकतो.शिवाय नगरसेवक रमेश पुणेकर, मोतीराम मोहाडीकर, राजेद्र नंदनवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, माजी आमदार यशवंत बाजीराव, मोरेश्वर ऊर्फ मनोज साबळे, आसीफ कुरैशी, अब्दुल शारिक पटेल, रमण पैगवार, शेख हुसेन, राजेश गिरींपुजे(महाजन), अमान उल्ला खान, रमण ठवकर, श्रीकांत ढोलके, नफिसा सिराज अहमद, तौशिक अहमद अब्दुल वसीफ यांनी अर्ज घेत दावेदारी सादर केली आहे. सध्याची पक्षातील एकूण स्थिती लक्षात घेता अनिस अहमद यांना येथे पक्षांतर्गत आव्हान मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.या मतदारसंघातील हलबा मतदारांची संख्या लक्षात घेता भाजपातून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचा मोठा दावा आहे. माजी महापौर प्रवीण दटके यांनीही दावा केला आहे. दटके यांच्याकडे नुकतेच प्रभारी शहराध्यक्षपद सोपविण्यात आल्यामुळे वेगवेगळे कयास लावण्यात येत आहे. याशिवाय येथून निवडणूक लढण्याचा अनुभव असलेल्या दयाशंकर तिवारी यांच्या नावाचादेखील ऐनवेळी विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसपाकडून या मतदारसंघातून प्रदीप निमजे हे प्रामुख्याने इच्छुक आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून येथे मोठा धक्का दिला जाऊ शकतो. येथील मुस्लीम व हलबा मतदारांची संख्या लक्षात घेता मोठ्या पक्षातील नाराज उमेदवारांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.२००९ च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा भाजपाचे कमळ फुलले. कॉंग्रेसचे राजू देवघरे यांचा त्यांनी १० हजार ७९१ मतांनी पराभव केला होता. बसपाचे गनी खान यांनी २३ हजारांहून अधिक मते घेत चांगली टक्कर दिली होती. तर २०१४ च्या निवडणुकांत कॉंग्रेसने परत एकदा अनिस अहमद यांच्यावर विश्वास दाखविला तर भाजपाने विकास कुंभारे यांनाच मैदानात उतरविले. जातीय समीकरणांमुळे लढत चुरशीची होईल अशी अपेक्षा होती. मात्र कुंभारे यांचे मताधिक्य २७ हजारांनी वाढले व त्यांनी ३८ हजार ७१ मतांनी विजय मिळविला होता.भाजपाचे ‘बूथ’पातळीवर काम सुरूलोकसभा निवडणुकांत भाजपाला मध्य नागपुरातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. २०१४ मध्ये भाजपाला ४५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. २०१९ मध्ये हा आकडा घटून २२ हजार ४९७ वर आला. ही बाब पक्षाने गंभीरतेने घेतली असून येथे नवीन मतदार नोंदणीवर भर देण्यात येत आहे. मध्य नागपुरात मुस्लीमबहुल भाग जास्त प्रमाणात असला तरी भाजपाने येथे संघटन मजबुतीवर आणि ‘बूथ’पातळीवर कामावर भर दिला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसनेदेखील गृहसंपर्काला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकांत बसपाने मोहम्मद जमाल यांना उतरविले. मात्र मुस्लीमबहुल भाग असूनदेखील या मतदारसंघात त्यांना १ हजार ६९२ मतेच घेता आली. तर वंचित बहुजन आघाडीला १ हजार १२९ मतांवर समाधान मानावे लागले.
जातीय समीकरणांचे गणित जुळविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:50 AM
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येणाऱ्या मध्य नागपूरमध्ये अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच मतदारसंघात येते व त्यामुळे ही जागा भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे.
ठळक मुद्देभाजपकडून कुंभारे की नवा चेहरा ?काँग्रेसमध्ये इच्छुकांची लांबलचक यादी