नागपूर : काेराेनामुळे लावण्यात आलेला लाॅकडाऊन किरकाेळ दुकानदार व व्यावसायिकांसाठी परीक्षा घेणारा ठरला. माेबाइल रिपेअरिंग व इलेक्ट्राॅनिक्स साहित्य दुरुस्ती करणाऱ्यांनाही या झळा साेसाव्या लागल्या. अशा मेकॅनिक्सचे काम ठप्प पडले हाेते. त्यामुळे कुटुंबाच्या पालनपाेषणाचे माेठे आव्हान त्यांनी साेसले. कुणाच्या दुकानाचे भाडे थकले, तर कुणाचे कर्जाचे हप्ते चुकले. अनेकांची कुटुंब याच कामावर अवलंबून असल्याने प्रचंड कुचंबना झाल्याचेही दिसून आले. आता लाॅकडाऊन उठल्याने विस्कटलेली संसाराची घडी सुधारेल, अशी अपेक्षा या कामगारांनी व्यक्त केली.
रेशनच्या धान्यावर दिवस काढले
राहुल लाेणारे यांची इलेक्ट्रॉनिक्स साहित्य दुरुस्तीची दुकान हुडकेश्वर नाक्यावर भाड्याच्या घरात आहे. दुकानाचे भाडे ९,००० रुपये व वीजबिल वेगळे आहे. वडील आणि पत्नीसह दाेन मुलांचे उदरभरण याच व्यवसायाच्या भरवशावर आहे. पहिल्या लाटेतही पाच-सहा महिने गेले व दुसऱ्या लाटेतही दाेन महिन्यांपासून काम बंद हाेते. दाेन्ही वर्षांचे सीजन वाया गेले. दुकान बंद असली, तरी दुकानाचे भाडे द्यावेच लागले व इलेक्ट्रिक बिलही भरावे लागले. दुकानासाठी काढलेल्या कर्जाची नाेटीस येत हाेती, पण पैसाच नसल्याने ते भरणे शक्य झाले नाही. या काळात कुटुंबाला अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. अनेकदा किरणा आणायलाही पैसा राहत नव्हता. कधी नव्हे, ते रेशनच्या धान्यावर पाेट भरावे लागले. काम बंद पडल्याने सरकारकडून वीजबिल, कर्जाचे हप्ते व इतर कर माफ करणे अपेक्षित हाेते, पण तसे झाले नाही. आता लाॅकडाऊन उठले असले, तरी परिस्थिती सुधारायला बराच वेळ लागेल.
लाॅकडाऊन उघडल्याने वेगाने काम मिळेल
प्रदीप जाधव आपल्या भावासाेबत काॅलनुसार टीव्ही, फ्रिज, मायक्राे ओव्हन दुरुस्तीचे काम करतात. गेल्या दीड वर्षापासून कामच बंद पडले आहे. या वर्षीही लाॅकडाऊनचे दाेन महिने कठीण गेले. आठवड्यातून एखाद-दाेन काम मिळत असे. तेही चाेरूनलपून करावे लागले. कारण गत्यंतरच नव्हते. त्याच्यावरच गुजराण चालली हाेती. मात्र, दुकाने बंद असल्याने रिपेअरिंगचे साहित्य मिळण्यास खूप अडचण गेली. लाॅकडाऊन उघडल्याने दिलासा मिळाला. आता कामे वेगाने हाेतील व परिस्थिती सुधारेल, ही अपेक्षा आहे.
कर्ज काढून घर चालविण्याची वेळ
अनिकेत माेहिते यांचे सदर भागात माेबाइल रिपेअरिंगचे दुकान आहे. पहिल्या वर्षी जवळपास पाच महिने व यावेळी दाेन महिने काम बंद हाेते. राेजगाराचे दुसरे साधनच नसल्याने घर कसे चालवावे, हा प्रश्न हाेता. या काळात खूप अडचणी सहन कराव्या लागल्या. कर्ज घेऊन, मदत घेऊन गरजा भागवाव्या लागल्या. बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू केली हाेती, पण तेही रद्द करावे लागले. इलेक्ट्रॉनिक्स साहित्यही बाहेर देशातून येतात, त्यामुळे त्या सामानासाठीही मारामार हाेती. अशी वेळ पुन्हा येऊ नये, असे वाटते.