नागपूर : लोकसभा निवडणूक प्रकरणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिलासा देणाऱ्या आदेशाविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्विचार अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने शुक्रवारी गडकरी यांना या अर्जावर येत्या १ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
अर्जावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट व्यवहार केल्यामुळे गडकरी यांची निवड रद्द करण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे, तसेच त्यांनी स्वत:ला विजयी घोषित करण्याची मागणीही निवडणूक याचिकेत केली आहे.
उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०२१ रोजी गडकरी यांचा एक अर्ज अंशत: मंजूर करून निवडणूक याचिकेतील काही निरर्थक व अवमानजनक परिच्छेद वगळण्याचा पटोले यांना आदेश दिला. पटोले यांचा या आदेशावर आक्षेप आहे. न्यायालयाने या आदेशावर पुनर्विचार करावा, अशी विनंती त्यांनी संबंधित अर्जाद्वारे केली आहे.