नागपूर : गणेश विसर्जन व ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणूका एकाच दिवशी आल्यामुळे पोलीस यंत्रणेची परीक्षा होणार आहे. विशेषत: शहरातील वाहतूक कोंडी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वाहतूक विभागातर्फे यादृष्टीने नियोजन करण्यात येत असून गुरुवारी शहरात जड वाहनांना प्रवेश राहणार नसल्याचे पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात निर्देशदेखील जारी करण्यात आले आहे.
शहरात २८ व २९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशमंडळांच्या मूर्तींचे विसर्जन कण्यात येणार आहे. तर घरांमधील गणेशमूर्तींचे विसर्जन शहरातील फुटाळा तलाव, गांधीसागर तलाव, सक्करदरा तलाव, सोनेगाव तलाव, कोराडी तलाव या ठिकाणी असलेल्या कृत्रीम तलावांमध्ये होईल. गणेश विसर्जन व ईदच्या मिरवणूकांसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होवून वाहतूकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच वाहतूक सुरळीत राहावी व सामान्य नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री तीन वाजेपर्यंत तसेच शुक्रवारी दुपारी चार ते शनिवारी रात्री तीन वाजेपर्यंत जड वाहतुकीला बंदी असेल. अत्यावश्यक सेवेत असलेल्या शासकीय वाहनांना हे नियम लागू राहणार नाहीत. तसेच परिस्थितीनुसार योग्य मार्गाने वाहतूक वळविण्याचे अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे उपायुक्त तिडके यांनी स्पष्ट केले आहे.