योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षपदावरुन डॉ.प्रवीण तोगडिया यांची गच्छंती झाल्यानंतर संघटनेसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. संघभूमीतील अनेक कार्यकर्तेदेखील या निर्णयाने नाराज आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी मौन साधले असले तरी अंतर्गत चर्चांमध्ये नाराजीचा सूर निघतो आहे. अनेकांनी तर विश्व हिंदू परिषदेचे कार्य करणेदेखील थांबविले आहे. विशेषत: तोगडिया यांच्यानंतर विहिंपकडे तरुणाईला साद घालणारा आश्वासक चेहरा नसल्याने संघभूमीत विश्व हिंदू परिषदेसमोर समोरची वाट बिकट असणार हे निश्चित आहे.विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष असताना डॉ.प्रवीण तोगडिया यांचे नागपुरात नियमित दौरे व्हायचे व ते येथील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचे. त्यांच्याकडे पाहून अनेक तरुण विहिंपच्या कार्यात सहभागी झाले. विहिंप म्हणजे तोगडिया असे समीकरण तयार झाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाहीर टीका केल्यानंतर तोगडियांबाबत संघ परिवारात नाराजीचा सूर निर्माण झाला होता. यंदाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत डॉ.तोगडिया उपस्थित झाले होते. मात्र ती उपस्थिती औपचारिक होती व ते काहीसे अलिप्त पडल्याचे दिसून आले होते. विहिंपच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुका घेण्यात आल्या व तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला.वयाने ज्येष्ठ असलेल्या विष्णू कोकजे यांच्याकडे तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेल्या संघटनेची धुरा आली. या निकालानंतर तोगडिया यांच्या समर्थनार्थ नागपुरातील अनेक कार्यकर्ते समोर आले व संविधान चौकात ते उपोषणावरदेखील बसले. अनेकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तर शेकडो कार्यकर्त्यांनी विहिंप, बजरंग दलाचे काम करणेच बंद केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘विहिंप’चा दावा, संघटना मजबूतयासंदर्भात ‘विहिंप’चे पदाधिकारी अधिकृतरीत्या बोलण्यास तयार नाहीत. मात्र एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने गोपनीयेतच्या अटीवर काही कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे मान्य केले. डॉ.प्रवीण तोगडिया यांचे कार्यकर्त्यांमध्ये आकर्षण होते व त्यांची कार्यशैली त्यांना आवडायची. मात्र ‘विहिंप’ व्यक्तीपूजक नाही. संघटनेला महत्त्व देण्यात येते. विदर्भातील पावणेतीन हजार गावात ‘विहिंप’चे सक्रिय काम आहे. केवळ नागपुरात काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. ती लवकरच दूर होईल, असा विश्वास आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.तोगडियांच्या संघटनेत जाणारनागपुरातून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे काम सोडलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. तोगडिया यांच्याकडून नवीन संघटना सुरू करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यासंबंधात नागपुरातील पदाधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली आहे. परंतु याबाबत अंतिम निर्णय शनिवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. सूरतमध्ये विशेष बैठकदेखील आयोजित करण्यात आली आहे. मागील आठवड्यापर्यंत विहिंपशी जुळलेले कार्यकर्ते तोगडिया यांच्या पाठीशी असून संघभूमी असली तरी आम्ही तोगडिया यांच्याच संघटनेचे काम करू, अशी माहिती विहिंपच्या गोरक्षा विभाग प्रमुखपदाचा राजीनामा दिलेले राजेश शुक्ला यांनी दिली.