नागपूर : भक्तीचा भाव घेणारे भजन अन् हृदयीचा ठाव घेणारी गजल, असा दोन्ही सुरेल अनुपम संगतचा नजराणा म्हणजे भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा होत. हा नजराणा नागपूरकरांना शुक्रवारी प्रत्यक्ष अनुभवता आला आणि त्यांच्या संगतचा ईश्वरी आस्वाद सहजभावाने घेता आला.
लोकमतचे संस्थापक स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दी पूर्तीच्या पर्वावर लोकमत मिडिया ग्रुपच्या वतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात भजन-गजल संध्येच्या माध्यमातून बाबूजींना स्वरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पद्मश्री अनुप जलोटा यांनी सादर केलेले भजन उपस्थितांच्या भक्तीचा ठाव घेणारे आणि सादर केलेल्या गजल मनाचा वेध घेणारे होते.
यात गायक, वादक आणि रसिकांची सम एक झाली होती आणि अखेर अनुप जलोटा यांनी ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभीं अलविदा ना कहेना’ ही गजल सादर केली आणि ती सम भंग पावली. ‘हम लौट आयेंगे, तुम युहीं बुलाते रहेना’ असे म्हणत, या संगीत संध्येचा समारोप झाला.