१५ दिवसांत किलोमागे ३० रुपयांची वाढ : तूर डाळही महागलीनागपूर : गेल्या वर्षी १२५ ते १३० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या चणा डाळीच्या किमती यावर्षी अर्ध्यावर आल्या खऱ्या, पण गेल्या १५ दिवसांत किलोमागे तब्बल ३० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या चणा डाळीचा भाव प्रतिकिलो ७६ ते ८२ रुपये इतका आहे. याशिवाय तूर डाळीतही चार ते पाच रुपयांची वाढ झाल्याची माहिती इतवारी ठोक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. यावर्षी चण्याचे पीक अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. ग्राहकांकडून अचानक मागणी वाढल्यामुळे दरवाढ झाली आहे. तसे पाहता गतवर्षीच्या १२५ ते १३० रुपयांच्या तुलनेत यावर्षी भाव कमी असल्याची माहिती धान्य बाजाराचे समीक्षक रमेश उमाटे यांनी सांगितले. बाजारात धान्य आणि कडधान्याची खरेदी वाढली आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात धान्य साठवणुकीची प्रथा आहे. ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे तांदूळ आणि गव्हाच्या किमतीत थोडीफार वाढ झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मालाला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले. त्याचा प्रारंभी परिणाम दिसून आला. पण त्याचा प्रभाव काही दिवसानंतर ओसरला. इतवारी ठोक बाजारात महिन्यापासून तूर डाळीचे क्विंटलचे भाव ५५०० ते ७००० रुपयांवर स्थिर होते. मागणी वाढल्यामुळे त्यात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली. तसेच महिन्यापूर्वी ५२०० ते ६००० रुपये किमतीवर पोहोचलेली चणा डाळा ७६०० ते ८२०० रुपयांवर पोहोचली आहे. पुढील काही दिवसांत तूर डाळ स्थिर राहील, पण चणा डाळीच्या किमती वाढण्याची शक्यता उमाटे यांनी व्यक्त केली. याशिवाय अन्य डाळीच्या किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्यावर्षी १६० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या उडद डाळीचे भाव सध्या दर्जानुसार ९२ ते १०५ रुपये किलो आहे. गेल्या काही दिवसांत या डाळीत क्विंटलमागे ५०० रुपयांची तेजी आली. इतवारी ठोक बाजारात मूंग मोगर ६४०० ते ७२०० रुपये क्विंटल, मूग डाळ ६००० ते ७००० रुपये तर काही दिवसांपूर्वी ७५०० रुपये क्विंटलवर गेलेल्या मसूर डाळीचे दर ६००० ते ६५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गहू व तांदळाची विक्री वाढलीसध्या बाजारात गहू व तांदळाची विक्री वाढली आहे. मागणीनंतर दोन्ही धान्याच्या किमतीतही थोडीफार वाढ झाली आहे. यंदा गव्हाचे चांगले उत्पादन आहे. इतवारी ठोक बाजारात गहू लोकवन २००० ते २३०० रुपये क्विंटल, तुकडा २२०० ते २४००, एमपी सरबती २५०० ते ३५०० रुपये भाव आहेत. होळीमध्ये १३५ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले काबुली चण्याचे भाव आता ११५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यंदा श्रीराम व चिन्नोर तांदळाला जास्त मागणी आहे. श्रीराम (अरवा) ४२०० ते ४६०० रुपये क्विंटल, श्रीराम (स्टीम) ४५०० ते ४७५०, चिन्नोर ४२०० ते ४६००, बीपीटी ३००० ते ३३००, सुवर्णा २२०० ते २५००, श्रीराम खंडा २१०० ते ३००० आणि चिन्नोर खंडा २१०० ते ३२०० रुपये भाव आहेत. यावर्षी मुबलक उत्पादनांमुळे भाव फारसे वाढणार नाहीत, अशी शक्यता रमेश उमाटे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
चणा ‘गरम’!
By admin | Published: April 10, 2017 2:18 AM