लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या रविवारी नागपूरमध्ये होऊ घातलेल्या लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत सहभागी विविध धर्मांच्या आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारण्याची संधी ‘लोकमत’च्या वाचकांना मिळणार आहे. वाचकांकडून आलेल्या प्रश्नांपैकी निवडक पाच प्रश्नांवर सुरेश भट सभागृहात होणाऱ्या या परिषदेत चर्चा घडवून आणली जाईल.
‘लोकमत’ नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवारी, २४ ऑक्टोबरला ‘धार्मिक सौहार्द : वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर ही आंतरधर्मीय परिषद होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर, पंतजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, अजमेर शरीफ दर्ग्याचे गद्दी नशिन हाजी सईद सलमान चिश्ती, मुंबईच्या जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस, लेह-लद्दाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिख्खू संघसेना, ‘बीएपीएस’ स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरू ब्रह्मविहारीदास स्वामी असे मान्यवर आध्यात्मिक गुरू या परिषदेत जगभरातील धार्मिक संघर्ष तसेच त्यावरील उपायांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत सामान्य नागरिकांना पडणाऱ्या अशांतता व असहिष्णुतेविषयीच्या प्रश्नांसाठी वेळ राखून ठेवण्याचा निर्णय लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी घेतला आहे.
असे विचारा प्रश्न...
*परिषदेत सहभागी मान्यवर धर्मगुरूंपैकी कोणाला व कोणता प्रश्न आहे, याचा स्पष्ट उल्लेख असलेले प्रश्न वाचकांनी nk.nayak@lokmat.com या ई-मेलवर शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळपर्यंत पाठवावेत.
*‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातील संपादकांचे मंडळ आलेल्या प्रश्नांतून पाच प्रश्नांची निवड करील. संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. त्याबद्दल तक्रार करता येणार नाही. परिषदेदरम्यान संबंधित आध्यात्मिक गुरूंना ते प्रश्न विचारले जातील.
हेही वाचा -
'लोकमत'तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद; 'सामाजिक सौहार्द्राच्या जागतिक आव्हानां'वर महामंथन