नागपूर : संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून मान्सून माघारी परतला आहे. तसेच पुढील एक-दोन दिवसांत राज्यातून मान्सून पूर्णपणे परतणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार (Rain alert) पावसाची चिन्हे आहेत.
शनिवारी १६ ऑक्टोबर रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत. तर, रविवारी कमी अधिक प्रमाणात राज्यात हवामाची स्थिती हीच कायम राहणार आहे. रविवारी हवामान खात्याने राज्यात नागपूरसह अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वाशीम, अकोला, बुलडाणा, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली, या पंधरा जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी कोरड्या हवामानाची शक्यता आहे.