नागपूर : मुंबई, काेकण क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यातही विदर्भ, मराठवाड, खांदेशच्या २२ जिल्ह्यात गुढीपाडवा व दुसऱ्या दिवशीही वादळासह गारपीट हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण छत्तीसगडमधून विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक, तामिळनाडू हाेत काेमरिनकडे वाहणाऱ्या वारा खंडितता प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुढचे चारपाच दिवस अवकाळीचे सावट राहणार आहे. रविवार ७ एप्रिलपासून ढगाळ वातावरण तयार हाेईल व ८ एप्रिलला तुरळक ठिकाणी पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. रविवारी जळगाव, भंडारा-गोंदिया जिल्ह्यामध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दोन-तीन ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. नागपूरसह गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर व बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून तुरळक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागानुसार ९ व १० एप्रिल राेजी विदर्भात वादळ, गारपीट व तुरळक ठिकाणी जाेरदार पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे. यानंतर पुढचे एकदाेन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान विदर्भात शनिवारीही आकाश काहीसे ढगांनी व्यापले हाेते. त्यामुळे तापमानात अंशत: घट झाली. सर्वाधिक ४२.४ अंश तापमान चंद्रपुरात व त्याखाली यवतमाळला ४२ अंशाची नाेंद झाली. नागपूरचे कमाल तापमान ४०.६ अंशावर आले. अकाेला, अमरावती, ब्रम्हपुरी, गडचिराेली, वर्धा जिल्ह्यात पारा ४१ अंशाच्यावर आहे. रात्रीच्या तापमानात मात्र हलकी वाढ दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाहीलाही हाेत आहे. आता पुढचे काही दिवस अवकाळीच्या सावटने लाेकांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.