नागपूर : बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेला तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढच्या काही तासात चक्रीवादळात रुपांतर हाेणार आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूची किनारपट्टी व पुडूचेरीच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. घड्याळाच्या विरूद्ध दिशेने फिरणारे हे वादळ महाराष्ट्राच्या मुंबईसह काेकण व मध्य महाराष्ट्रातून जाईल. यामुळे काही दिवस किरकाेळ अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ढगाळ वातावरणाव्यतिरिक्त विदर्भावर त्याचा प्रभाव नसेल.
उत्तर - पश्चिमेकडील वातावरणाच्या प्रभावामुळे सध्या थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. नागपूरसह विदर्भात काहीसे ढगाळ वातावरण आहे आणि पुढचे काही दिवस असेच राहणार आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्री व दिवसाचा पारा चढला आहे. नागपुरात मंगळवारी १५.२ अंश किमान तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा १.७ अंश अधिक आहे. अकाेला, यवतमाळात ते १८ अंशांवर पाेहचले आहे. सरासरीत असलेल्या गाेंदिया व गडचिराेलीवगळता इतर जिल्ह्यात रात्रीचा पारा चढला आहे. दिवसाच्या तापमानातही काही अंशांची वाढ सर्वत्र दिसून येत आहे. नागपुरात कमाल तापमान ३०.४ अंश नाेंदविण्यात आले. पुढच्या तीन दिवसात रात्रीचा पारा ४ अंशाने, तर दिवसाचा पारा २ अंशाने वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, पारा चढल्याने थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. दिवसा गारव्याऐवजी उष्णतेची जाणीव हाेते. रात्रीसुद्धा बाहेर गारवा जाणवत असला तरी घराच्या आतमध्ये काहीसी उष्णता जाणवते. त्यामुळे बंद पडलेले पंखे पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. पहाटेच्या वेळी मात्र अधिक थंडीची जाणीव हाेते. पुढचे काही दिवस किंवा आठवडाभर तरी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.