नागपूर : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पारा सरासरीपेक्षा खाली असला तरी उन्हाचे चटके मात्र जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात सूर्याची प्रखरता कायमच अधिक राहिली आहे. गेल्या दशकात २०१६ पासून सलग ४ वर्षे एप्रिलचा पारा ५४ अंशाच्या वर गेला आहे. २००९ मध्ये ताे ४७ अंशावर पाेहोचला हाेता. सध्याचा अंदाज पाहता, यावेळीही उन्हाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.
साेमवारी नागपूरला ३७.४ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. ती सरासरीपेक्षा २ अंशाने कमीच आहे. गाेंदिया व गडचिराेली वगळता इतर जिल्ह्यांत पारा सरासरी गाठण्याच्या तयारीत आहे. वर्धा ३९.२ अंश आणि अकाेला ३० अंशासह सर्वाधिक तापमानाची नाेंद झाली. याशिवाय यवतमाळ ३८.४ अंश, अमरावती ३८.२ अंश, ब्रम्हपुरी ३८.४ अंश, तर चंद्रपूर ३८.२ अंश नाेंदविण्यात आले. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ हाेत असून नागपूरला २४ तासांत २.३ अंशाने वाढून २१.३ अंश किमान तापमान नाेंदविण्यात आले. इतर सर्व जिल्ह्यांतही रात्रीचा पारा १९ ते २२ अंशाच्या सरासरीत आहे. ढगाळ वातावरणाची शक्यता आता निवळली असल्याने येथून पुढे तापमान वाढण्याचीच शक्यता आहे.
गेल्या दशकभरात एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता तापदायकच ठरली हाेती. २०१६ ते २०१९ पर्यंत एप्रिलमध्ये अनुक्रमे ४५ अंश, ४५.५ अंश, ४५.३ अंश व ४५.२ अंश सर्वाधिक तापमान नाेंदविण्यात आले. २०१२ पासूनच्या इतर वर्षांत एप्रिलचा पारा ४३ ते ४४ अंशावर राहिला आहे. गेल्यावर्षी २६ ते ३० एप्रिलदरम्यान वैदर्भीयांना उष्ण लाटांचाही सामना करावा लागला. आतापर्यंत २००९ मध्ये सर्वाधिक ४७.१ अंश तापमान नाेंदविण्यात आले, तर १९६८ साली १ एप्रिल राेजी ते १३.९ अंशापर्यंत घसरले हाेते. १९३७ साली या महिन्यात १२९ मिमी. पाऊस झाला हाेता.
यावर्षी एल-निनाेचा प्रभाव
२०२० ते २०२२ पर्यंत भारतावर ला-निनाेचा प्रभाव हाेता, ज्यामुळे चांगला पाऊस झाला. यावर्षीपासून एल-निनाे अधिक सक्रिय राहणार असल्याने उन्हाळा अधिक तीव्र वाटण्याची शक्यता हवामान अभ्यासकांची आहे. तसे महाराष्ट्रात तापमान सरासरीएवढे राहणार आहे, पण पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेलीत ते सरासरीच्यावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये एक-दाेनदा ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.