सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यू, स्क्रब टायफसच्या प्रकोपासोबतच आता चंडिपुराचा (मेंदूज्वर) धोकाही निर्माण झाला आहे. २००८ ते २०१२ मध्ये चांगलाच धुमाकूळ घातलेल्या या आजाराने त्यावेळी ३७ बळी घेतले होते. सहा वर्षानंतर आता पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात सहा रुग्णांची नोंद होताच आरोग्य विभागाने याला गंभीरतेने घेतले आहे. मेंदूज्वराच्या विषाणूंच्या तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू गडचिरोलीत जाणार आहे.चंडीपुरा तापाचे रुग्ण सर्वप्रथम भंडारा जिल्ह्यातील चंडीपुरा येथे १९६५ साली आढळले होते. त्यावरून या तापाला चंडीपुरा असे नाव देण्यात आले. ‘सँडफ्लाय’पासून चंडीपुराची लागण व प्रसार होतो. मुख्यत: गाई, म्हशी व अन्य गुरेढोरांवर या ‘सँडफ्लाय’ आढळतात. ग्रामीण भाग असलेल्या ठिकाणी हा आजार लवकर पसरतो. चंडीपुराने २००५ साली पूर्व विदर्भात हाहाकार माजविला होता. त्यानंतर चार वर्षांनी, २००९ व २०१० मध्ये चंडीपुराने ३० मुलांचे बळी घेतले तर ९३ रुग्ण आढळून आले होते. यात भंडाऱ्यातील दहा, गोंदियातील दोन, नागपूर, वर्धेतील प्रत्येकी तीन, गडचिरोलीत पाच तर चंद्रपूर जिल्ह्यात सात मृत्यूची नोंद झाली होती. आरोग्य विभागाच्या विशेष उपाययोजनेमुळे २०११पासून रुग्ण व मृत्यूची संख्या कमी-कमी होत गेली. २०१३ ते २०१७ पर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात कुठेच रुग्णांची नोंद झाली नाही. परंतु या वर्षी गडचिरोली जिल्ह्यात सहा रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येताच खळबळ उडाली.
काय आहे चंडीपुरा ?‘सँडफ्लाय’ गुरांना चावल्यानंतर चंडीपुराचे विषाणू त्यांच्या शरीरात शिरतात. त्यानंतर ते रात्री एखाद्या व्यक्तीला चावल्यास हे विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश घेतात. अशा प्रकारे चंडीपुराचा प्रसार होतो. या आजारात व्हायरल तापासारखा ताप येतो व चंडीपुराची लागण झाल्यास पोट दुखणे, जुलाब, उलट्या होतात. ताप मोठ्या प्रमाणात वाढून तो मेंदूत गेल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. चंडीपुरावर नेमका औषधोपचार नाही. लक्षणे बघून उपचार केला जातो.
नागपूर, चंद्रपूरमध्ये शेवटी आढळला होता रुग्ण४२०११ मध्ये चंडीपुराने भंडाऱ्यातील दोन तर गोंदियातील एका रुग्णाचा जीव घेतला. त्यानंतर २०१२ मध्ये नागपूरमध्ये दोन रुग्णांची तर चंद्रपूर जिल्ह्यात एका रुग्णाच्या बळीची नोंद आहे. हे शेवटचे रुग्ण ठरले. त्यानंतर या वर्षी या आजाराचे रुग्ण आढळून आले.
‘एनआयव्ही’चे पथक जाणार गडचिरोलीत२०१२ नंतर या वर्षी केवळ गडचिरोली जिल्ह्यात चंडीपुराचे सहा रुग्ण आढळून आले आहे. या विषाणूंची माहिती व अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (एनआयव्ही) एक पथक ३० सप्टेंबरला येत आहे. आरोग्य विभागाकडून उपाययोजना केली जात आहे.-डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक, आरोग्य विभाग नागपूर