नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे 'नाचता येईना आंगण वाकडे' म्हणत पवार हे केंद्राकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आलेली ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आज नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी आपल्याला केंद्रातील भाजपकडून सत्तेसाठी ऑफर आली होती मात्र आपण ती स्वीकारली नाही त्यामुळे तपास यंत्रणेकडणं राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास दिला जातोय, असे म्हटले होते. यावर प्रत्रकाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्राकडून आलेल्या ऑफरला नाही, म्हणण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत. केंद्राबरोबर असलेल्या सरकारबरोबरच महाराष्ट्रातील सरकर स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं, असेही पाटील म्हणाले.
राज्यातील कोळसा टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले, पवार हे सगळ्यांचे गुरू असल्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की त्याचा दोष केंद्र सरकारला देऊन मोकळे होतात. केंद्राने कोळसा दिला नाही असे ते म्हणतील मात्र, पावसामुळे कोळसा कमी मिळेल, त्यामुळे तो वेळेत स्टॉक करा असे केंद्राने आधीच सांगितले होते. मात्र, ते याबाबत बोलणार नाहीत, असेही पाटील म्हणाले. केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळशाचा साठा करण्यात कमी पडलो हेही ते सांगणार नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली.