नागपूर : उष्ण लहरींचे चटके विदर्भात अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. बुधवारी चंद्रपूरला तब्बल ४४.२ अंश तापमानाची नाेंद झाली. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात हे सर्वाधिक तापमान ठरले. एवढेच नाही, तर चंद्रपूर जगातील चाैथ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर ठरले. तज्ज्ञांच्यामते मागील १०० वर्षांत मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे.
हवामान विभागाने विदर्भ व मराठवाड्यात २ ते ३ एप्रिलपर्यंत उष्ण लहरींचा इशारा दिला हाेता. सूर्य सध्या विदर्भासह आंध्र प्रदेश व तेलंगणाच्या डाेक्यावरून जात असल्याने त्याची जाणीव हाेत आहे. उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत आहे. चंद्रपूरच्या मागाेमाग विदर्भातील इतर जिल्हेही चांगलेच भाजत आहेत. अकाेल्याचे तापमान कालप्रमाणे आजही ४३.२ अंशावर कायम राहिले. नागपूरच्या कमाल तापमानात वाढ हाेत ते ४२.१ अंशावर पाेहोचले आहे.
दुसरीकडे मराठवाड्यालाही उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्हे ४० अंशापार गेले आहेत, तर पुणे विभागात साेलापूरला सर्वाधिक ४२.८ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. मुंबई, काेकण व गाेव्यात तापमानाने काहीसा दिलासा दिला आहे.
५ एप्रिलपर्यंत दिलासा
सध्या सूर्य विदर्भाच्या डाेक्यावर असल्याने उष्णतेचा हा कहर किमान ३ एप्रिलपर्यंत सतावणार आहे. दरम्यान, अंदमान निकाेबार भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याद्वारे वादळ येण्याची शक्यता आहे. हे वादळ बंगालच्या उपसागराकडे सरकत जाईल. त्याच्या प्रभावाने ५ एप्रिलपर्यंत तापमानाचा दिलासा मिळेल, असा अंदाज प्रा. सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केला.